औरंगाबादः राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आगामी महाराष्ट्र दिनी (Maharashtra Din) होणाऱ्या सभेसाठी मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. औरंगाबाद विमानतळावर दुपारी साडे चार वाजता बाळा नांदगावकर पोहोचले. औरंगाबाद मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं विमानतळावर जंगी स्वागत केलं. यावेळी मनसेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे, जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, शहराध्यक्ष आशिष सुरडकर आदी उपस्थित होते. शहरात दाखल झाल्यानंतर बाळा नांदगावकर हे औरंगाबाद पोलीस आयुक्तांची भेट घेणार असून त्यांच्याकडे राज ठाकरे यांच्या सभेची परवानगी मागितली जाणार आहे. तसेच मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानाचीही ते पाहणी करणार आहेत.
राज ठाकरे यांच्या सभेला अवघे चार दिवस शिल्लक असताना पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे ही सभा होईल की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र आता आम्ही पोलीसांची भेट घेऊन त्यांना रितसर परवानगी मागणार आहोत, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. तसंच पोलीसदेखील सभेला परवानगी निश्चित देतील, असा विश्वास बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला.
राज ठाकरे यांची सभा ठरलेल्या ठिकाणी म्हणजे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होईल, असंही नांदगावकर यांनी सांगितलं. याच ठिकाणी बाळासाहेबांची सभा झाली होती. इंदिरा गांधींची सभा झाली होती. राज ठाकरेंची सभा झाली होती. त्यामुळे या मैदानाला वेगळा इतिहास आहे. तो बाजूला ठेवून दुसरीकडे सभा घेणार? असा सवाल बाळा नांदगावकर यांनी केला.
राज ठाकरे यांच्या एका भाषणामुळे देशभरातील नेत्यांमध्ये हिंदुत्वाचा अग्नी प्रज्वलित झाला, असं वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केलं. राज ठाकरे बोलायला लागले अन् नास्तिकची लोकं आस्तिक झाली. देवळात जायला लागली. फोटो टाकायला लागली. आंदोलनं करायला लागली. हनुमान चालिसावरून देशात अग्नी प्रज्वलित झाला. आता औरंगाबादच्या सभेनंतर आणखी अनेक बदल दिसतील, असं वक्तव्यही बाळा नांदगावकर यांनी केलं.