औरंगाबादः हिंदुत्वाची आग्रही भूमिका घेणाऱ्या राज ठाकरे यांची औरंगाबादेत (Aurangabad MNS) होऊ घातलेली सभा अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत आहे. सभेच्या स्थळापासून ते तारीख, वेळेपर्यंत सर्वच बाबतीत अत्यंत खबरदारीपूर्वक निर्णय घेण्यात येत आहेत. संवेदनशील शहर असलेल्या औरंगाबादची शांतता ढळू न देण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. तर शिवसेनेचा गड मानल्या गेलेल्या औरंगाबादेत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पावलावर पाऊल टाकत हिंदुत्वाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी मनसेदेखील आग्रही दिसत आहे. म्हणून राज ठाकरे यांच्या आगामी सभेच्या निमंत्रण पत्रिकेतूनही हिंदुत्वाचे मुद्दे अधिक ठळकपणे सांगण्याचे प्रयत्न केले आहेत. येत्या 01 मे रोजी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबादमध्ये सभा होत आहे. खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरच ही सभा होणार असून त्यासाठीच्या निमंत्रण पत्रिका वाटपाचे काम आता मनसेच्या वतीने सुरु करण्यात आले आहे.
मनसेच्या वतीने राज ठाकरे यांच्या आगामी सभेची निमंत्रण पत्रिका तयार करण्यात आली आहे. त्यावरून हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या पावलावर पुढचे पाऊल टाकणार असेच दिसते आहे. या पत्रिकेवर भगव्या शालीत लपटलेले राज ठाकरे दिसत असून पत्रिकेवर हिंदुत्वाची पताका दिसते. भगव्या झेंड्यावर हनुमानाची तसबीर…असे या पत्रिकेचे स्वरुप आहे. आता मनसेचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन या पत्रिका वाटणार आहेत.
राज्यात मुंबईनंतर औरंगाबाद महापालिका ही शिवसेनेचा गड मानली जाते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबादमधील ऐतिहासिक सभादेखील खूप गाजलेल्या आहेत. त्यातच मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील बाळासाहेबांच्या सभांना विशेष महत्त्व होते. त्यामुळे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत राज ठाकरे यांनी त्याच ठिकाणी आगामी सभा आयोजित केली आहे. मशिदीवरील भोंगे काढा, हनुमान चालिसाचे पठण करा अशा इशाऱ्यांनी हिंदुत्वाचे मुद्देही लावून धरले जात आहेत. त्यामुळे आता बाळासाहेबांच्या पावलावर राज ठाकरेंचे पाऊल पडणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्या-