औरंगाबादः सध्या औरंगाबाद शहरातील (Aurangabad city) पाणी प्रश्न अत्यंत गंभीर असून तो सोडवणं सर्वात महत्त्वाचं आहे. यासाठी विराट मोर्चे काढण्याची आणि नौटंकी करण्याची गरज नाही. एमजेपीच्या अधिकाऱ्यांसोबत बसून प्रश्न सोडवण्याची गरज आहे. मात्र भाजपला हे कळत नाहीये. फडणवीस साहेबांना (Devendra Fadanvis) मी आव्हान देतो, तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरून दाखवा, लोक तुम्हाला हंड्यांनी हाणतील, असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी दिला. शहरातील विविध भागातील लोकांना भरमसाठ पाणीपट्टी भरूनही आठ ते नऊ दिवसांनी पाणी येते, या मुद्दयावरून शिवसेनेला विरोधकांनी धारेवर धरलं आहे. यासाठी मनसे, भाजप आंदोलन करत आहे. येत्या 23 मे रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात औरंगाबादमध्ये भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मात्र पैशांच्या जोरावर ही नौटंकी आणि नाटक करून काहीही उपयोग नाही, असं इम्तियाज जलील म्हणाले.
आज पाणी प्रश्नावरून आंदोलन करणाऱ्या भाजपने स्वतः महापालिकेच्या सत्तेत असताना काय केले, असा सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी केला. समांतर योजनेचा निर्णय भाजप शिवसेनेने घेतला होता. ही कंपनी भाजपच्याच एका नेत्याची होती. मात्र ती पूर्णत्वास नेली नाही. सत्तेत असतानाही आपण जनतेला लुटून खाल्ले. आणि आता हा मोर्चा काढताय, फडणवीस साहेब, लोकांचा शिवसेना आणि भाजप दोघांवरही रोष आहे. तुम्ही भाजप नगरसेवकाच्या वॉर्डात एकटे फिरलात तर जनता तुम्हाला रिकाम्या हंड्याने हाणेल, असा इशारा खासदार जलील यांनी दिला.
औरंगजेबाच्या कबरीवर खासदार इम्तियाज जलील आणि अकबरूद्दीन ओवैसी यांनी फुलं वाहिली, यावरून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. अनेक नेत्यांनी आपल्यासाठी धमकीवजा भाषा वापरली आहे. मात्र या सर्वांना योग्य वेळ आली की उत्तर देईन. मनसे, शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी जी भाषा वापरली आहे, ती सगळी जनता ऐकत आहे. त्यांच्यावर पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. त्यामुळे माझ्याकडे पण जीभ आहे. तिचा मी योग्य वापर करेन आणि या लोकांना योग्य उत्तर देईन. सध्या तरी शहराचा पाणी प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचा असल्याचं खासदार जलील यांनी सांगितलं.