Aurangabad | Raj Thackeray यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर त्याच मैदानावर… Imtiaz Jaleel यांचा काय इशारा?
राज ठाकरे यांच्या सभेत पोलिसांनी सांगितलेल्या नियमांचं उल्लंघन होऊनही कारवाई झालेली नाही, यावर बोलताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले, ' आम्ही वाट पाहत आहोत. पोलीस काय कारवाई करतील याची. एवढं बोलूनही पोलीस आणि सरकार का गप्प बसलं आहे कळत नाही.
औरंगाबादः औरंगाबादच्या सभेनंतर अद्याप राज ठाकरेंवर (Raj Thackeray) गुन्हा दाखल झालेला नाही. राज ठाकरे यांना वेगळे नियम असतील.. त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नसेल तर लिहून घ्या… त्याच मैदानावर त्यापेक्षा जास्त गर्दी जमवून..आणखी चांगली भाषा वापरून सभा घेईन.. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला नाही तर माझ्यावरही कुणी कारवाई करु शकणार नाही, अशा कडक शब्दात खासदार इम्तियाज जलील (Imtiazz Jaleel) यांनी पोलिसांना इशारा दिला आहे. औरंगाबादमधील राज ठाकरे यांच्या सभेसाठी पोलिसांनी (Aurangabad police) काही नियम आणि अटींचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यापैकी काही नियमांचं त्यांनी उल्लंघन केल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांकडून सभेच्या काळातील संपूर्ण डेटाचा अभ्यास करण्यात येत आहे. मात्र अद्याप राज ठाकरे यांच्याविरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही. यावर संताप व्यक्त करताना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी हा इशारा दिला आहे.
काय म्हणाले खासदार जलील?
राज ठाकरे यांच्या सभेत पोलिसांनी सांगितलेल्या नियमांचं उल्लंघन होऊनही कारवाई झालेली नाही, यावर बोलताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले, ‘ आम्ही वाट पाहत आहोत. पोलीस काय कारवाई करतील याची. एवढं बोलूनही पोलीस आणि सरकार का गप्प बसलं आहे कळत नाही. साडेनऊ वाजता सभा संपली तर दहा वाजता एफआयआर रजिस्टर व्हायला पाहिजे होतं. त्याचं कारण काय आहे? उद्धव ठाकरेंना वाटतंय की ते माझे भाऊ आहेत? त्यांच्यासाठी वेगळे नियम आहेत. राष्ट्रवादीकडे गृहखातं आहे. त्यांना असं वाटतंय की येत्या काळात निवडणुका आल्या आहेत. आपल्याला मनसेसोबत जाण्याची वेळ आली तर कसं होणार.. एफआयआर कशासाठी करायची? हे चालणार नाही, असा इशारा खासदार जलील यांनी दिला.
… तर आताच लिहून घ्या!
राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल झाला नाही तर एमआयएमची पुढील भूमिका काय असेल, हे स्पष्ट करताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले, नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत. राज ठाकरेसाठी जे नियम आहेत तेच नियम इम्तियाज जलीलसाठी आहेत.पोलिसांनी कठोर कारवाई केली नाही तर तुम्ही हे लिहून घ्या. त्याच ग्राउंडवर जितकी पब्लिक त्यांनी आणली होती, त्यापेक्षा जास्त पब्लिक आणणार. ज्या भाषेत त्यांनी बोललं होतं, त्यापेक्षा चांगली भाषा मी वापरेन. मग पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही तर माझ्यावरही कुणी कारवाई करू शकत नाही.