Aurangabad | औरंगाबाद महापालिकेत नवे प्रशासक रुजू, डॉ. अभिजित चौधरींनी पदभार स्वीकारताच कोणता दिला आदेश?
महापालिकेचे नवे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि शहरातील तत्कालीन आयुक्त आस्तिक कुमार पांडेय मंगळवारी महापालिकेत पोहोचले. मनपात येताच डॉ. चौधरी यांनी मनपा मुख्यालयातील प्रत्येक विभागाला भेट दिली
औरंगाबादः औरंगाबाद महापालिकेच्या प्रशासक पदाची सूत्र डॉ. अभिजित चौधरी (Abhijit Chaudhari) यांनी हाती घेतली आहे. मागील 2 वर्षे 7 महिन्यांपासून आस्तिक कुमार पांडेय (Astik kumar Pandey) हे महापालिकेच्या प्रशासक (Aurangabad Municipal Corporation) पदावर होते. मंगळवारी डॉ. चौधरी यांनी महापालिका आय़ुक्त आणि प्रशासकाची सूत्र हाती घेतली. आस्तिक कुमार पांडेय यांनी डॉ. अभिजित चौधरी यांचं स्वागत केलं. डॉ. चौधरी यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. शहरातील मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करेन, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. तसेच महापालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना अधिक उत्कृष्ट सुविधा मिळतील, याला मी प्राधान्य देईन, असंही डॉ. चौधरी यांनी सांगितलं. शहरातील विकास आराखडा पूर्ण करण्यासाठी, नौकर भरतीसाठी सरकारी पातळीवर पूर्ण प्रयत्न करेन, असंही त्यांनी सांगितलं.
पालिकेतील प्रत्येक विभागाला भेट
महापालिकेचे नवे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि शहरातील तत्कालीन आयुक्त आस्तिक कुमार पांडेय मंगळवारी महापालिकेत पोहोचले. मनपात येताच डॉ. चौधरी यांनी मनपा मुख्यालयातील प्रत्येक विभागाला भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, माझे मित्र आस्तिक कुमार पांडेय यांनी अडीच वर्षांच्या कार्यकाळात शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांचे चांगले निर्णय मी पुढेही अंमलात आणेन. डॉ. चौधरी यांनी पदभार स्वीकारताच त्यांच्या अधिकार कक्षेत येणाऱ्या सर्व प्रमुख विभागांना भेट दिली. तसेच त्यांच्याकडील प्रलंबित कामे आणि आवश्यक सुविधांसाठीचे सादरीकरण करण्याचे निर्देश दिले. या माध्यमातून आपण शहरातील प्रश्न जाणून घेणार असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगतलं.
Shri Pandey introduced the new CEO to the Aurangabad Smart City Team and showed him the the facilities developed at the new building @SmartCities_HUA @itdpindia @Secretary_MoHUA @MoHUA_India pic.twitter.com/rLURAgNkU1
— Aurangabad Smart City (@AurangabadSmart) August 2, 2022
लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून विकासकामे करणार
पत्रकारांशी चर्चा करताना डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, जे अधिकारी महापालिका प्रशासन आणि जनतेच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करतील, त्यांना माझी साथ असेल. मात्र जे अधिकारी कामात कुचराई करतील, त्यांना माफी मिळणार नाही. शहराच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधींकडून सहकार्य मिळवण्याला माझे प्राधान्य असेल.