औरंगाबादः शहरातील महापालिका निवडणुकांमधील (Aurangabad municipal corporation) कायदेशीर अडसर दूर झाला आहे. तरीही निवडणुकांच्या दृष्टीने सध्या म्हणाव्या तेवढ्या हालचाली दिसून येत नाहीयेत. कारण महापालिका निवडणुका (Election) एवढ्यात होण्याची शक्यता कमी आहे. महापालिकेच्या निवडणुकीआधी प्रभाग रचनेचा आराखडा आणि मतदार याद्या (Voters list) अंतिम करणे आवश्यक आहेत. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान दोन ते सव्वा दोन महिने लागतील. त्यानंतर येतोय पावसाळा. या काळात निवडणुका घेता येत नाहीत. त्यामुळे महापालिका निवडणुकांसाठी थेट हिवाळा म्हणजे ऑक्टोबर महिनाच उजाडू शकतो, असे बोलले जात आहे. त्यामुळे यंदाची महापालिका गाजवूनच दाखवणार, या इच्छेला पेटलेल्या उमेदवारांची पुरती निराशा होत आहे. निवडणुकांची वाट पाहणाऱ्या इच्छुकांची प्रतीक्षाच जणू पणाला लागली आहे.
महापालिकेची सार्वजनिक निवडणूक एप्रिल 2019 मध्ये होणार होती. मात्र कोरोनामुळे ही निवडणूक लांबणीवर पडली. त्यानंतर वॉर्ड रचनेच्या विरोधात काही नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीबाबत जैसे थे आदेश दिले होते. दरम्यानच्या काळात राज्य शासनाने महापालिकेच्या निवडणुका एकसदस्यीय ऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आधीची वॉर्ड रचना आपोआपच रद्द झाली. सुप्रीम कोर्टानंही हे प्रकरण निकाली काढलं. तरीही निवडणुकीची सर्व प्रक्रिया पावसाळ्या आधी पूर्ण होणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एवढ्या दिवसांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले इच्छुकही निवडणुकांची वाट पाहून थकले आहेत. आता त्यांना कार्यकर्ते सांभाळणंही कठीण झालं आहे.
इतर बातम्या