नांदेडः अवघ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या औरंगाबादच्या (Aurangabad) देवगिरी कॉलेजमधील (Deogiri Collage) घटनेत कुमारी सुखप्रीतकौर (कशिश) हिचा मृत्यू झाला. एकतर्फी प्रेमातून झालेल्या या हत्याकांडानंतर सुखप्रीत कौरच्या (Sukhprit Kaur) अस्थींचे विसर्जन सोमवारी सायंकाळी पाच वाजता नांदेडमधील गोदावरी नदीत करण्यात आले. गुरुद्वारा तखत सचखंडचे हेड ग्रंथी भाई कश्मीरसिंघजी, शीख समाजातील प्रतिष्ठित नागरिक आणि नतेवाईकांच्या उपस्थितित शीख धार्मिक परंपरेनुसार अस्थींचे विसर्जन पार पडले. तत्पूर्वी गुरुद्वारा येथून अरदास करून यात्रेच्या रुपात अस्थि कलश गोदावरीच्या नगीनाघाट येथे नेण्यात आले. नगीनाघाट येथे दिवंगत मुलीचे वडील स. प्रीतपालसिंघजी ग्रंथी आणि त्यांच्या कुटुंबियांनी शोकाकुल वातावरणात अस्थींचे विसर्जन केले. त्यावेळी उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले होते.
विशेष म्हणजे दिवंगत मुलीचे आजोळ नांदेडचे होय. गुरुद्वाराचे माजी जत्थेदार सचखंडवासी स्व. संतबाबा हजूरासिंघजी यांचे भाऊ स. बलबीरसिंघ धूपिया हे मुलीचे आजोबा होय. तर स. जसबीरसिंघ धूपिया, राजूसिंघ धूपिया यांची ती भाची होती. सुखप्रीतकौर (कशिश) मनमिळाऊ स्वभावाची होती व नांदेडला नेहमीच यायची. पण दोन दिवसांपूर्वी ती एका विक्षिप्त मानसिकतेची बळी ठरली. एका युवकाने एकतर्फा प्रेमातून तिच्यावर तीक्ष्ण हत्यारानं हल्ला करून तिचे प्राण घेतले.
निर्दयतेचे कळस गाठणाऱ्या त्या घटनेचा उल्लेख करत दिवंगत सुखप्रीतकौरच्या (कशिश) वडिलांनी मागणी केली की देशातील मुलींवर असले हल्ले करणाऱ्या विरुद्ध कडक कायदा अमलात आणला गेला पाहिजे. तर उपस्थित नातेवाईकांनी सुखप्रीतकौरच्या मारेकरीला त्वरित शिक्षा मिळायला हवी, असा आग्रह कायम ठेवला. असे प्रकार समाजात पुन्हा घडू नयेत, याचा विचार करून मारेकऱ्याला फाशीसारखी शिक्षा ठोठाविण्यात यावी अशी मागणी केली.
शनिवारी 21 मे रोजी दुपारी औरंगाबादधील देवगिरी कॉलेजमध्ये सुखप्रीत कौर हिच्यावर एकतर्फी प्रेमातून हल्ला झाला. घटनेतील आरोपी शरणसिंग याने तिला कॉलेज परिसरातून 200 फूट ओढत नेत धारदार शस्त्रानं तिला मारलं. यात तिचा मृत्यू झाला. भर दिवसा घडलेल्या या घटनेनं औरंगाबादसह अवघ्या महाराष्ट्राला हादरा बसला. हल्लेखोराला लासलगाव येथून पोलिसांनी अटक केलं.