औरंगाबादः महापालिका निवडणुकांच्या (Municipal corporation) पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील (Aurangabad) पाणी प्रश्न (water issue) विविध राजकीय पक्षांकडून अधिकच जोरदार पणे उचलून धरला जात आहे. मनसेची पाणी संघर्ष यात्रा, भाजपचे 23 मे रोजी होणारे जल आक्रोश आंदोलन या दोन पक्षांनी सत्ताधारी शिवसेना आणि मनपा अधिकाऱ्यांवर दबाव वाढत आहे. त्यातच भाजपच्या आंदोलनाचा प्रभाव कमी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही पाणी प्रश्नावर आंदोलन करण्यात आलं. शहरातील पुंडलिक नगर भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नागरिकांनी हंडा मोर्चा काढला. हा परिसर भाजपचे आमदार अतुल सावे यांच्या मतदार संघात येतो. गेल्या अनेक वर्षांपासून आमदारांनी परिसरातील पाणी प्रश्नावर काहीही उपाययोजना केल्या नाहीत, त्यामुले आज सकाळीच शेकडो महिला व पुरुषांनी रिकाम्या घागरी आणि मातीचे माठ घेऊन अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर गर्दी केली. काही कार्यकर्त्यांनी सावेंच्या कार्यालयासमोर मातीचे माठ फोडून निषेध व्यक्त केला. सकाळी 11 वाजेच्या सुमारास राष्ट्रवादीतर्फे हा मोर्चा काढण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने औरंगाबाद शहरातील भाजप आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर भाजपा कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाले. भाजपा कार्यकर्त्यांनी अतुल सावे यांच्या कार्यालयावर धाव घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजप आमदार अतुल सावे हे सुद्धा उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्याच सरकारमधील मंत्र्यांच्या घरांवर मोर्चे काढावेत अशी प्रतिक्रिया सावे यांनी दिली. आपलं अपयश झाकण्यासाठी सत्ताधाऱ्यांतर्फेच मोर्चा काढण्यात आल्याचं सावे यांनी सांगितलं.
येत्या 23 मे रोजी भाजपच्या वतीने शहरात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढला जाणार आहे. पैठण गेट परिसरातून निघालेला हा मोर्चा महापालिका आयुक्तालयावर धडकणार आहे. फडणवीसांच्या उपस्थितीमुळे नागरिकांसाठी हा मोर्चा विशेष परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी प्रश्नावर वेगाने उपाययोजना करण्यासाठी मनपाची धावाधाव सुरु आहे. तसेच भाजपच्या आंदोलनातील हवा काढून घेण्याचे हर तऱ्हेचे उपायही वापरून पाहिले जात आहेत. यापैकीच हा आजचा मोर्चा असल्याचे बोलले जात आहे.