Aurangabad | लाखो वारकऱ्यांच्या रुपात गोदाकाठी अवतरलं नवचैतन्य, नाथषष्ठी उत्सावासाठी 4 लाखांहून अधिक भाविक
राज्यभरातून आलेल्या दिंड्यांमधील भाविकांनी गोदावरी वाळवंट, यशवंतनगर, भानुदासनगर, लक्ष्मीनगर, कावसनकर स्टेडियम, पंचायत समिती परिसर, नाराळा, गागाभट्ट चौक, संतपीठ, यात्रा मैदान आदी ठिकाणी 300 हून अधिक राहुट्या उभारण्यात आल्या आहे. तीन दिवस यांचा पैठणमध्ये मुक्काम आहे, अशी माहिती वारकरी संप्रदायाचे दिनेश पारीक यांनी दिली.
औरंगाबादः कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून वारकऱ्यांच्या दर्शनासाठी आसुसलेला गोदाकाठ (Godawari river) जणू विविध रंगांनी आज फुलून गेलाय. नाथषष्ठी उत्सवासाठी लाखो भाविक दाखल झाले असून त्यांच्या रुपानं साक्षात नवचैतन्यच जणू पैठण नगरीत अवतरल्याचं चित्र सध्या दिसून येतंय. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातूनही 500 पेक्षा जास्त दिंड्या पैठणमध्ये (Paithan) दाखल झाल्या आहेत. पहिल्याच दिवशी चार लाखांवर भाविकांनी संत एकनाथ महाराज (Sant Eknath Maharaj) यांच्या समाधी मंदिरात दर्शन घेतले तर 300 पेक्षा जास्त राहुट्यांनी गोदाकाठ रंगला आहे. हातात भगवा ध्वज, गळ्यात तुळशमाळ, महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, मुखात भानुदास एकनाथाचा जयघोष, हाताने टाळ-मृदुंगांचा गजर करीत शहराच्या रस्त्यांवरून दिंड्या मंदिराकडे जात होत्या.
अभंगाच्या तालावर मानाची दिंडी मंदिराकडे
बुधवारी गावातील नाथमंदिरातून नाथ वंशज आणि मानकऱ्यांची मानाची निर्याण दिंडी पारंपपरिक अभंगांच्या गजरात काढण्यात आली. या दिंडच्या अग्रभागी सजवलेला रुबाबदार अश्व, झेंडेकरी त्यानंतर विणेकरी, अमृत संस्थानची छत्री, नाथवंशजांच्या छत्र्यानंतर संस्थानिक अंमळनेरकर महाराजांची दिंडी, भगवान गडाची दिंडी व सर्वात शेवटी वारकरी अशा क्रमाने अभंगाच्या तालावर मार्गक्रमण करण्यात आले. मानाची ही दिंडी गावातील नाथमंदिरातून निघून बाहेरील नाथमंदिरात नेण्यात आली.
पैठणमधील मंदिरे फुलली
वारकऱ्यांच्या रुपानं नव चैतन्य पैठणमध्ये अवतरल्यामुळे शहरातील सर्व मठ आणि मंदिरं, मंगल कार्यालये वारकऱ्यांच्या उपस्थितीने खचाखच भरली आहेत. या मठ-मंदिरांतून दिंड्यांसोबत आलेले वारकरी महाराज कीर्तन, प्रवचन, भजन करतात. यामुळे हरिनामाच्या गजराने पैठण नगरी दुमदुमून गेली आहे.
300 राहुट्या, आरोग्य शिबिराची मोफत सुविधा
राज्यभरातून आलेल्या दिंड्यांमधील भाविकांनी गोदावरी वाळवंट, यशवंतनगर, भानुदासनगर, लक्ष्मीनगर, कावसनकर स्टेडियम, पंचायत समिती परिसर, नाराळा, गागाभट्ट चौक, संतपीठ, यात्रा मैदान आदी ठिकाणी 300 हून अधिक राहुट्या उभारण्यात आल्या आहे. तीन दिवस यांचा पैठणमध्ये मुक्काम आहे, अशी माहिती वारकरी संप्रदायाचे दिनेश पारीक यांनी दिली. यात्रेतील लाखो वारकऱ्यांसाठी समाजसेवी संस्थांतर्फे अनेक ठिकाणी आरोग्य शिबिराची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उत्सवात आज काय?
संत एकनाथ महाराजांच्या नावाने आज विविध पुरस्कारांचे वाटप होईल. तसेच श्री एकनाथ संस्थानाधिपत भैय्यासाहेब महाराज पैठणकर यांच्या वाड्यातील एकनाथ महाराजांच्या पादुकांची मिरवणूक असले. नाथ मंदिरातून आज रात्री 1 वाजता नगर प्रदक्षिणा करून गावातील नाथ मंदिरात दिनांक 25 मार्च रोजी आरतीने धबिन्याची समाप्ती होईल.
इतर बातम्या-