Aurangabad | संभ्रम दूर, ऐतिहासिक नाथषष्ठी यात्रा भरणार, मंत्री भुमरेंची पैठणमध्ये घोषणा, आज जिल्हाधिकाऱ्यांची बैठक
या यात्रेसाठी एक कोटींपेक्षा जास्त अनुदान जिल्हा प्रशासानाकडे येते. मात्र प्रशासनाकडून यात्रेची तयारी धीम्या गतीने सुरु होती. त्यामुळे यात्रा भरणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला होता.
औरंगाबादः राज्यात पंढरपूरनंतरची सर्वात मोठी नाथ षष्ठी (Nath Shashthi Yatra) यात्रा कोरोना संकटामुळे मागील दोन वर्ष भरली नव्हती. अजूनही जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने नियोजित उद्दिष्ट गाठले नाही. त्यामुळे या वर्षी तरी हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली पैठणमधील यात्रा भरणार की नाही, असा संभ्रम होता. मात्र या वर्षी ही यात्रा होणार असून स्थानिक प्रशासानाने (Paithan Administration) वेगाने तयारी करावी, असे आदेश मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी दिल्या. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. नाथषष्ठीची यात्रा येत्या 23 मार्चपासून सुरु होत असून यानिमित्त रोजगार व फलोत्पादन मंत्री भुमरे यांनी विशेष बैठक घेतली. उप विभागीय अधिकारी स्वप्निल मोरे, तहसीलदार दत्तात्रय निलावाड, नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, मुख्याधिकारी संतोष आगळे, आदीच्या उपस्थितीत ही शनिवारी बैठक घेण्यात आली. तर रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत यावर विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.
रविवारपासून रांजण भरण्यास प्रारंभ
दरम्यान, नाथषष्ठीच्या या उत्सावात रविवारी 20 मार्च म्हणजेच तुकाराम बिज पासून संत एकनाथ महाराज वाड्यातील मंदिरातील रांजण भरण्यास प्रारंभ होईल. यात्रेच्या निमित्ताने जायकवाडी येथील गोदावरी नदी पात्रात पाणी सोडले जाणार आहे. या यात्रेसाठी एक कोटींपेक्षा जास्त अनुदान जिल्हा प्रशासानाकडे येते. मात्र प्रशासनाकडून यात्रेची तयारी धीम्या गतीने सुरु होती. त्यामुळे यात्रा भरणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला होता. भुमरे यांच्या बैठकीनंतर आता पुढील दोन दिवसात काय काय तयारी होणार, असा प्रश्न व्यापारी आणि वारकऱ्यांना पडला आहे. तरीह यात्रेसाठीची तयारी नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती मुख्यधिकारी संतोष आगळे यांनी दिली.
पाचशेहून अधिक दिंड्या
नाथषष्ठीच्या या उत्सावात दरवर्षी राज्यभरातून वारकरी दिंड्या घेऊन निघतात. यावर्षीदेखील अनेक गावांतून नारकरी पैठणच्या दिशेने निघाले आहेत. मात्र प्रशासकीय पातळीवर पुरेशा आरोग्य सुविधा नाही. पैठणमधील नाव्यांची सफाई अजूनही झालेली नाही. केवळ गोदावरी नदीपात्रातील खड्डे बुजवण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. येत्या दोन दिवसात प्रशासक काय काय तयारी करतेय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
20 मार्च ते 25 मार्च नाथषष्ठीचा सोहळा
रविवारपासून सुरु होणारा नाथषष्ठीच्या सोहळ्यात पुढील कार्यक्रम होतील.-
- 20 मार्च रोजी – भगवान श्रीकृष्णाने श्रीखंड्याच्या रुपात ज्या रांजणात पाणी भरले, तो रांजण दुपारी 1 वाजता भरण्यास सुरुवात होईल.
- 22 मार्च- विजयी पांडुरंगास अक्षत देऊन इतर मानकऱ्यांना एकनाथ नाथषष्ठीचे निमंत्रण दिले जाईल. हा अक्षत कार्यक्रम संध्याकाळी नाथ मंदिरात सात वाजता होईल.
- 23 मार्च रोजी- विजयी पांडुरंगास महाभिषेक, वारकरी पूजन, संत एकनाथ महाराजांच्या चरित्राचे चित्रप्रदर्शन, कुलोत्पन्न नाथवंशजांची मानाची दिंडी, महाप्रसादाचा कार्यक्रम असेल.
- 24 मार्च रोजी सप्तमीच्या दिवशी छबिना व गुरुपूजन
- 25 मार्च रोजी अष्टमीच्या दिवशी काला दहीहंडीचा कार्यक्रम असेल.
इतर बातम्या-