औरंगाबादः येत्या 01 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची जाहीर सभा औरंगाबाद आयोजित करण्यात आली आहे. मात्र औरंगाबाद पोलिसांच्या (Aurangabad police)नव्या आदेशानंतर ही सभा होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज ठाकरे यांच्या सभेला आधीच जवळपास 13 राजकीय संघटनांनी विरोध दर्शवला आहे. पोलिसांनीदेखील सभेला अद्याप परवानगी दिलेली नव्हती. त्यातच आता येत्या 09 मे पर्यंत आता औरंगाबादमध्ये जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अशा स्थितीत राज ठाकरे यांच्या विराट सभेला किमान एक लाख लोक येतील, असा दावा मनसेतर्फे करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काढलेल्या आदेशामुळे मोठा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची सभा ठरलेल्या वेळेत आणि ठरलेल्या ठिकाणी होईल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज ठाकरे यांच्या सभेची औरंगाबादमध्ये जोरदार तयारी सुरु असतानाच मनसेला मोठा झटका बसलाय. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी शहरात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. औरंगाबाद शहराच्या हद्दीत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था बिघडू नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता मनसेसमोर मोठे आव्हान आहे.
राज ठाकरे यांच्या सभेसाठी अनेक अडचणी निर्माण केल्या जात आहेत. मात्र त्यातूनही आम्ही ही ऐतिहासिक सभा घेणारच आहोत. राज ठाकरे यांच्या सभेला पोलीसदेखील परवानगी देतील, असा विश्वास औरंगाबाद मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी व्यक्त केला. शहरात जमावबंदी लागू झाली असली तरीही आज किंवा उद्या पोलिसांकडून ही परवानगी मिळेल, असं वक्तव्य सुमित खांबेकर यांनी केलंय.
इतर बातम्या-