Raj Thackeray | विरोध करणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावू, औरंगाबादेत मनसे सरचिटणीस दिलीप धोत्रेंचा इशारा
मनसे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांची औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद
औरंगाबाद | राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादमधील सभेला (Aurangabad MNS) विरोध करणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावू. आमच्या सभेला पाठींबा वाढत आहे. ही सभा थांबवण्याचा कोणात दम नाही. आम्ही हातावर हात धरून बसलो नाहीत, असा इशारा मनसेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांनी दिला. औरंगाबादमध्ये आज त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी हा इशारा दिला. येत्या 01 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील विविध संघटनांचे कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती दिलीप धोत्रे यांनी दिली.
बॅनरवरून शिवसेनेवर टीका
राज ठाकरे यांच्याविरोधात शहरात अनेक ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांनाही शेवटी अयोध्येला जावेच लागणार, अशी वेळ कुणावरही येऊ नये, अशी उपरोधिक टीका या माध्यमातून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यासाठी राज ठाकरे यांनीच तयार केलेल्या व्यंगचित्राचा आधार घेण्यात आला आहे. शहरात हे बॅनर्स लावण्यामागे शिवसेनेचा हात असल्याची टीका दिलीप धोत्रे यांनी केली. औरंगाबादमध्ये शिवसेनेला आता फार काम राहिलेले नाही. त्यातच राज ठाकरे यांनी येथे सभा घेण्याची घोषणा केल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीकाही दिलीप धोत्रे यांनी केली आहे.
‘कोणत्याही स्थितीत, ठरलेल्या ठिकाणीच सभा होणार’
राज ठाकरे यांची येत्या महाराष्ट्र दिनाची ही सभा खडकेश्वर परिसरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर घेण्यात येणार आहे. मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता ही सभा इतर ठिकाणी घेता येईल का, अशी पोलिसांकडून चाचपणी सुरु आहे. शहरातील गरवारे स्टेडियमचाही यात विचार केला जातोय, अशी चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया देताना दिलीप धोत्रे म्हणाले की, कोणत्याही स्थितीत आधी ठरलेल्या ठिकाणीच मनसेची सभा होणार आहे. यासाठी परवानगी मिळो अथवा न मिळो, आम्ही आजवर अनेक केसेस अंगावर घेतल्या आहेत. त्यात आणखी वाढ होईल. राज्यात सर्वाधिक केसेस मनसेनेच अंगावर घेतल्या आहेत. त्यामुळे आम्हाला यामुळे काहीही फरक पडणार नाही, असा इशाराही दिलीप धोत्रे यांनी दिला.
मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांचे ट्वीट-
#सत्तेसाठी_ज्यांनी_लाचारी_पत्करली_त्या_लाचारांचा_समाचार_घेण्यासाठी_आतां_फक्त_१०_दिवस_बाकी….!
१ मेच्या ऐतिहासिक सभेचे साक्षीदार व्हा….!
#जयश्रीराम#मनसे #संभाजीनगर #हिंदुत्व pic.twitter.com/b3UOiWABsM
— Sumit Khambekar (@KhambekarSumit) April 21, 2022
इतर बातम्या-