Aurangabad| संततधार पावसानं औरंगाबादेतील सरला बेटाला गोदावरीचा वेढा, आजचा गुरुपौर्णिमा कार्यक्रम रद्द
औरंगाबाद जिल्ह्यात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने खऱ्या अर्थाने हजेरी लावली. मराठवाड्यात मंगळवारी सर्वदूर संततधार पाऊस सुरु होता.
औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर (Vaijapur) आणि अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यांना जोडणारे स्थान म्हणजे सरला बेट (Sarala Bet Gurupournima). दर वर्षी सरला बेटावर गंगागिरी महाराज (Gagangiri Maharaj) यांनी सुरु केलेल्या गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो. औरंगाबादच नव्हे तर राज्यभरातील भाविक येथील महोत्सवाला हजेरी लावतात. मात्र यंदा राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. तसेच औरंगाबादमध्येही दोन दिवसांपासून कुठे संततधार तर कुठे जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सरला बेटालाही गोदावरी नदीच्या पाण्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे या वर्षी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. महंत रामगिरी महाराजांनी ही माहिती दिली असून भाविकांनी आपल्या घरीच राहून गुरुपौर्णिमा साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
गोदावरीच्या मध्यभागी मंदिर
महंत रामगिरी महाराज यांच्या पुढाकारातून सरला बेटावर गंगागिरी महाराजांचं मंदिर बांधण्यात आलं आहे. महाराजांचा भक्त परिवार महाराष्ट्रात पसरलेला आहे. गोदावरीच्या मधोमध असलेल्या दहा एकर परिसरात हा मंदिर परिसर विस्तारलेला आहे. दहा एकर परिसरात औषधीयु्क्त वनस्पती, फळबागा, गोशाळा आहेत. बेटावर भाविकांची गर्दी लक्षात घेऊन रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी नदीच्या दुतर्फा पर्यावरणपूरक झाडे लावण्यात आली आहेत. गोदावरी नदीवर बेटाच्या चारही बाजूने पुलांची बांधणी करून मंदिराच्या आवारात हेलिपॅड, बेटावर चारही बाजूने व्यापारी संकुल, बेटासमोरच्या मैदानावर भव्य असे भक्त निवास तसेच गोशाळा उभारण्यात आली आहे.
औरंगाबादेत पावसाची जोरदार हजेरी
औरंगाबाद जिल्ह्यात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने खऱ्या अर्थाने हजेरी लावली. मराठवाड्यात मंगळवारी सर्वदूर संततधार पाऊस सुरु होता. नांदेडमध्ये जनजीवन विस्कळीत झाले. तर नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस असून गोदावरीला पूर आला आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात 45 हजार 938 क्युसेक वेगाने पाणी नाथसागर धरणात दाखल होत आहे. धरणाच्या पाणी पातळीत काल एकाच दिवसात तीन टक्क्यांनी वाढ झाली. नाथसागर जलाशय 40 टक्के भरले आहे, अशी माहिती अभियंता विजय काकडे यांनी दिली.