अंबादास माझ्या लेव्हलचे नाही, त्यांचे पद खूप छोटे, चंद्रकांत खैरेचं स्पष्टीकरण, औरंगाबाद शिवसेनेत शीतयुद्ध!
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने सुरु झालेल्या शिवसंवाद आणि शिवतेज या मोहिमांवरून गटातटाच्या राजकारणांच्या चर्चेला आणखीच ऊत आला आहे. या मतभेदांबाबत पत्रकारांनी चंद्रकांत खैरे यांना विचारले असता, त्यांनी स्पष्ट सांगितले, शिवसेनेत नेता हे सर्वात मोठे पद आहे. मी नेता आहे.
औरंगाबादः शिवसेनेचा बालेकिल्ला (Aurangabad Shiv sena) म्हणवल्या जाणाऱ्या औरंगाबादेत अनेकदा गटबाजी चव्हाट्यावर आलेली दिसते. मागील अनेक वर्षांपासून ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यातील दुराव्यामुळे शिवसेनेतील दोन गट स्पष्टपणे दिसतात. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शिवसेनेच्या वतीने सुरु झालेल्या शिवसंवाद आणि शिवतेज या मोहिमांवरून गटातटाच्या राजकारणांच्या चर्चेला आणखीच ऊत आला आहे. या मतभेदांबाबत पत्रकारांनी चंद्रकांत खैरे यांना विचारले असता, त्यांनी स्पष्ट सांगितले, शिवसेनेत नेता हे सर्वात मोठे पद आहे. मी नेता आहे. पक्षात केवळ तेरा नेते आहेत. नेत्यानंतर उपनेते असतात. त्याखाली संपर्कप्रमुख पद आहे. त्याच्याही खाली जिल्हा प्रमुख पद येते. अंबादास दानवे हे जिल्हा प्रमुख असल्याने ते माझ्या लेव्हलचे नाहीत. ते खूप छोटे आहेत. त्यांची माझ्याशी तुलनाच होऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिले. त्यामुळे औरंगाबाद शिवसेनेतील गटबाजीचे चित्र अधिकच स्पष्ट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
शिवसेनेतील सद्यस्थितीवर काय म्हणाले खैरे?
औरंगाबादेत संत एकनाथ रंगमंदिर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे बोलत होते. शिवसेनेतील सध्याच्या अंतर्गत राजकारणावर विचारलेल्या अनेक प्रश्नांना यावेळी खैरे यांनी उत्तरे दिली. ते म्हणाले, शहरात तीन आमदार आहेत. त्यांच्यावर मनपा निवडणुकीची जबाबदारी असेल. तर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि मी मोटबांधणी करणार आहोत.
किशनचंद तनवाणींचा योग्य सन्मान होईल- खैरे
माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्या राजकीय पुनर्वसनाविषयी खैरे यांना प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, तनवाणी हे भाजपतून आले आहेत. त्यांच्यासोबत भाजपात असलेले इतरही अनेकजण शिवसेनेत येतील. पक्षवाढीसाठी ते गरजेचे आहे. त्यामुळे तनवाणी यांच्याकडे एखादे पद दिले जाईल. त्यांचा योग्य सन्मान व्हावा, अशी शिफारस मी केली आहे.
मराठा-मराठेतर वादावर काय म्हणाले खैरे?
शिवसेनेत मराठा-मराठेतर असे जातीय राजकारण वाढत असल्याची चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा नियोजन समिती सदस्यांची निवडीनंतर हे जास्त अधोरेखित झाल्याचे बोलले जात आहे. यावर खैरे म्हणाले, शिवसेनेत सर्व जातीधर्माचे लोक आहेत. मराठा आहेत, मराठेतर आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या यादीत कदाचित तसे घडले असेल मी नाकारत नाही, परंतु पक्षात कधी एकाला तर कधी दुसऱ्याला संधी मिळत असते. कधी कधी आमचे आपापसात पटत नसेल, पण तरीही जेव्हा पक्षाचा विषय येतो अथवा एखादे संकट उभे राहते, तेव्हा आम्ही सर्व एकत्र येऊन काम करतो, असा दावाही खैरे यांनी केला.
सत्तारांवर कोणती महत्त्वाची जबाबदारी?
राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि तुमचे सूर जुळले आहेत, यामागे नेमके कारण काय, असाही प्रश्न खैरे यांना विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, सत्तार आता हिरवे राहिले नसून भगवे झाले आहेत. त्यांनी कार्यालयही भगवे केले आहे. पक्षप्रमुखांनी जादू केली आहे त्यांच्यावर. त्यामुळे ते भगवे झाले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची असेल.
इतर बातम्या-