Aurangabad | मी नाही, भाजपचे नेतेच बहिरे… देवेंद्र फडणवीसांच्या ओ खैरे, व्हा बहिरे.. ला चंद्रकांत खैरेंचं प्रत्युत्तर!
दरवेळी मी औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्यासाठी विनंती करायचो, मात्र त्यांनी कधीही ते गांभीर्यानं घेतलं नाही. आता शिवसेनेवर दबाव आणण्यापूर्वी आपण काय केलं, हे भाजपने पहावं.
औरंगाबादः औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर (Sambhaji Nagar) असं करण्याचं आता विसरा, अशी खोचक टीका करणाऱ्या फडणवीसांना शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी चांगलंच सुनावलं आहे. भाजपची सत्ता होती, तेव्हा मी फडणवीसांना अनेकदा विनंती केली. त्यांना भगवी शाल अर्पण करायचो, ते फक्त गोड हसायचे आणि हो करून टाकू असे म्हणायचे. पण औरंगाबादचं नाव संभाजीनगर काही केलं नाही. त्यांनी या कानाने ऐकलं आणि त्या कानाने सोडून दिलं. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भाषणातील आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत खैरे यांनाही टोला मारला. उद्धव ठाकरेंनी संभाजीनगर म्हटल्यावर ठराव मंजूर करण्याची गरज नाही. त्यामुळे ओ खैरे…व्हा तुम्ही बहिरे.. अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
शंभर भगव्या शाली…
भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले, भाजपचं सरकार असताना मी अनेकदा फडणवीसांचं भगवी शाल देऊन स्वागत केलं. अशा प्रकारे शंभर भगव्या शाली असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं होतं. दरवेळी मी औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्यासाठी विनंती करायचो, मात्र त्यांनी कधीही ते गांभीर्यानं घेतलं नाही. आता शिवसेनेवर दबाव आणण्यापूर्वी आपण काय केलं, हे भाजपने पहावं. भाजपचे सगळे मंत्री खोटारडे आहेत, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
ओवैसीवर भाजप कारवाई का करत नाही?
अकबरुद्दीन ओवैसी आणि MIM चे खासदार इम्तियाज जलील औरंगजेबाच्या कबरीवर जातात, नतमस्तक होतात. याविरोधात भाजप काहीच कारवाई करत नाही. कारण एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. ते यावर काहीच करणार नाहीत. उलट शिवसेनेवरच आरोप करतील. भाजपनेच वंचित आघाडीला सपोर्ट केला होता. त्यामुळेच तर त्यांची एवढी मोठी सभा औरंगाबादेत होऊ शकली, असा आरोप खैरे यांनी केला.