Sandipan Bhumre | शिंदेंचा एक फोन गेला अन् ठाण्यातली नाकेबंदी पहाता पाहता दूर.. महाराष्ट्र ते सूरत प्रवासाचे किस्से पैठणचे संदिपान भुमरे यांच्या शब्दात…
उद्धव ठाकरे यांच्याशी आमचा संवादच होऊ दिला जात नव्हता, अशी प्रमुख खंत भूमरे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ' फोन लावायचो, पण फोन देत नव्हते... तरीही भेट मिळत नव्हती.
मुंबईः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मंत्रिमंडळातले आमदार आणि मंत्री एकाएकी उठून बंडात शामिल झाले नाहीत, तर ही अनेक दिवसांपासूनची नाराजी होती. वारंवार आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत तक्रार केली, मात्र त्याकडे दुर्लक्ष झालं, अशी प्रतिक्रिया पैठणचे बंडखोर आमदार संदिपान भूमरे (Sandipan Bhumre) यांनी दिली. विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर सर्व आमदार सूरतच्या दिशेने कसे रवाना झाले, याचा किस्साही त्यांनी सांगितला. तसेच वाटेत ठाणे सोडताना राज्य सरकारच्या पोलिसांनी नाकेबंदी केली होती. पण एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) एक फोन गेला आणि नाकेबंदी पाहता पाहता आपोआप बाजूला सारली गेली. शिंदे यांच्या शब्दातच एवढा दम आहे, असं वक्तव्य संदिपान भूमरे यांनी केलं. विधानसभेत एकनाथ शिंदे यांनी बहुमत सिद्ध केल्यानंतर पैठणचे आमदार संदिपान भूमरे यांनी आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याशी बातचित केली.
बंड नव्हे हा तर उठाव..
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर हे बंड कसं उफाळून आलं, याविषयी विचारले असता संदिपान भूमरे म्हणाले, ‘ बंड नाही म्हणायचं हा उठाव आहे . आम्ही अनेक वेळा उद्धव साहेबांना कल्पना दिली होती. शिंदे साहेबांनाही कल्पना दिली होती. बऱ्याच दिवसांपासून आम्ही मंत्री त्यांच्या कानावर टाकत होतो. कामं होत नव्हती. आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. देशात हे पहिल्यांदा घडलंय. सत्ताधारीच हे फुटत नसतात. पण आम्हीच उठाव केलाय. पक्षातले जवळ जवळ 39 आमदार आणि 10 अपक्ष आमच्यासोबत होते. कोणत्याही परिस्थितीत युतीसोबत जाण्याचा निर्णय आम्ही एकमुखाने घेतला. युतीसाठी निवडणूक लढलो आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं..’
ऑफर दिली होती का?
महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला काही ऑफर दिली होती का, असे विचारले असता संदिपान भूमरे म्हणाले, ‘ सगळ्यांनाच मंत्रीपदमिळत नाही. कॅबिनेट मंत्री तर मी , दादा भुसे, गुलाबराव पाटील आहोत. यापेक्षा कुठलीही अपेक्षा ठेवली नाही. पैशावर सगळं काही होत नसतं. सगळे घरची परिस्थिती चांगली आहे. पदाच्या लालसेपोटी गेलेले नाहीत. तीन वर्षात कुठलंही काम मतदारसंघात झालं नाही, ही एकच आमदारांची तक्रार होती. त्यामुळे शेवटी सगळे एकत्र आले. जाताना आम्ही 20 होतो. नंतर 40 जमले. ऐनवेळीही संतोष बांगर आले. उदयसिंह राजपूत.. दोन गाड्या भरून पैसे गेल्याचा आरोप करत आहेत, त्यात तथ्य नाही. असं काहीही झालेलं नाही. उदयसिंहनी सांगायला पाहिजे होते, कोणत्या गाड्या होत्या. नितीन देशमुख या आमदारांना परत जायचं होतं, त्यांना एकनाथ शिंदेंनी स्वतःहून विमान करून दिलं.
संतोष बांगर ऐनवेळी आले…
संतोष बांगर यांचंही ऐनवेळी मन परिवर्तन झालं, असं संदिपान भूमरेंनी सांगितलं. ते म्हणाले, ‘ त्यांना वाटलं की खरी शिवसेना हीच आहे. हिंदुत्वाची शिवसेना आहे. हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आम्ही बाहेर पडलो आहोत, हे त्यांच्या लक्षात आलं. बाळासाहेबांचे विचार घेऊन हेच चालू शकतात. त्यांनी स्वतः एकनाथ शिंदेंना फोन केला. विश्वास दर्शक ठरावात शामिल होऊन मतदान करायचं..’
उद्धव ठाकरेंभोवती दोन-चारांचा विळखा
उद्धव ठाकरे यांच्याशी आमचा संवादच होऊ दिला जात नव्हता, अशी प्रमुख खंत भूमरे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘ फोन लावायचो, पण फोन देत नव्हते… तरीही भेट मिळत नव्हती. कार्यकर्ते येतात, आमदार विचारत होते.. पण उद्धव साहेबांना दोन-चार जणांच्या विळख्याच्या बाहेर जाऊ देत नव्हते. त्यांनी समजून घेतलं असतं तर ही वेळ आज आली नसती. बंड केल्यानंतर जी भाषा वापरली, ती ऐकून खूप वाईट वाटत होती…
मुंबई ते सूरत…
सूरतपर्यंतच्या प्रवासाचे किस्से सांगताना संदिपान भूमरे म्हणाले, विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा आम्ही रात्री मंत्रालयात होतो. शिंदे साहेबांचा फोन आला. म्हणाले, आपल्याला जायचं. आम्ही मंत्रालयातून बंगल्यावर गेलो. ठाणे- सूरत- सूरतला जवळ गेल्यावर कळलं की आपण गुजरातमध्ये जात आहोत… शिंदे साहेबांच्या गाडीत, अब्दुल सत्तार , नितीन देशमुख होतो. आम्हीही विचारलं नाहीत. ठाण्याच्या जवळ आम्हाला पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. शिंदे साहेबांनी गाडीतून फोन लावले. नाकाबंदी पाहता पाहता दूर झाली. शिंदे साहेबांची किमया, त्यांच्याभोवतीचं वलय आहे. शिंदे साहेबांचा एक फोन सरकारवर भारी पडतो. कुठलाच अधिकारी नाही म्हणत नाही. म्हणूनच सगळे आमदार शिंदेंच्या शब्दात असतात.