औरंगाबादः औरंगाबाद ते नाशिक (Aurangabad- Nashik) राज्य मार्गावर एक विचित्र अपघात झाला. नाशिकडे जाणाऱ्या या शिवशाही बसचे (ShivShahi Bus) दोन्ही टायर अचानक फुटले. या अपघातामुळे (Accident) मोठा आवाज झाला. गाडी वेळीच थांबली. बसमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. मात्र यातील चालक गंभीर जखमी झाला आहे. मे महिन्यात उन्हाचा पारा आता चांगलाच वाढला असल्याने राज्यभरात अशा विविध घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी धावती कार किंवा दुचाकी दुपारच्या वेळी पेट घेत आहेत. उन्हाचाच परिणाम म्हणून नाशिककडे जाणाऱ्या या बसचेही टायर फुटले असावेत, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावरील निफाड तालुक्यातील विंचुर जवळील म्हसोबा माथ्यावर अपघात झाला. औरंगाबाद येथून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या गाडी क्रमांक MH 18 BG 2998 या शिवशाहीचे समोरील दोन्ही टायर फुटले. त्यामुळे अचानक स्फोटासारखा आवाज होऊन बस जागीच थांबली. समोरील दोन्ही टायर फुटल्याने गाडीला जबरदस्त हादरा बसला. बसची समोरील काच पूर्णपणे फुटली. या घटनेत चालक गंभीर जखमी झाला आहे.
निफाड तालुक्यातील विंचुर जवळ झालेल्या या अपघातात शिवशाहीचा चालक गंभीर जखमी झाला. मात्र या अवस्थेतही त्याने बसवरील नियंत्रण न सुटू देता, प्रवाशांचे प्राण वाचवले. बसमध्ये 15 प्रवासी होते. हे सर्व प्रवासी सुखरुप आहेत. या शिवशाहीतील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती लासलगाव आगारचे व्यवस्थापक समर्थ शेळके यांनी दिली. दरम्यान, जखमी चालकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.