Aurangabad | स्मार्ट सिटीअंतर्गत मालमत्ता सर्वेक्षण करणाऱ्या तरुणांची फसवणूक? फक्त 2 हजारांवरच बोळवण?
ज्यांना दीड ते दोन हजार मानधन मिळाले आहे, त्यांनी तेवढीच कामगिरी केली आहे. दहा हजार मानधन मिळण्यासाठी साडे चारशे फॉर्म भरावे लागतील. त्यानुसार पैसे दिले जातील, अशी प्रतिक्रिया कंपनी व्यवस्थापकांनी दिली आहे.
औरंगाबादः शहरात स्मार्ट सिटी (Aurangabad smart city) अंतर्गत मालमत्ता सर्वेक्षण (Property Survey) करण्यासाठी नेमण्यात आलेल्या तरुणांना अगदी कवडीमोल मानधन देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्मार्ट सिटीने शहरातील मालमत्ता सर्वेक्षण करण्यासाठी ब्ल्यू वेव्ह कंपनीमार्फत दीडशे तरुण-तरुणींची नियुक्ती करण्यात आली होती. या तरुणांना महिन्याला 10 हजार रुपये असा पगार देण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र दीड महिन्यानंतर या तरुणांना अवघे दोन हजार रुपये देण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मनपा (Aurangabad municipal corporation) अधिकाऱ्यांसह कंपनीचे ठेकेदार विजय जाधव यांनी हात वर केल्याचे तरुणांचे म्हणणे आहे. अखेर या 40 तरुणांनी बुधवारी पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांना निवेदन देत या संकटातून मार्ग काढण्याची विनंती केली.
10 हजार पगार ठरला होता- तरुणांची तक्रार
26 डिसेंबर 2021 रोजी शहरातील मालमत्ता सर्वेक्षणासाठी ब्लू वेव्ह कंपनीचे व्यवस्थापक विजय जाधव यांनी मनपा सभागृहात उमेदवारांची सामान्य परीक्षा घेतली. त्यात 10 हजार रुपये महिना,यात एक हजार पेट्रोल व एक हजार मोबाइल मेंटेनन्स देण्याचे आश्वासन देण्यात आले. 6 जानेवारी रोजी तरुण प्रत्यक्ष कामावर रूजू झाले. 150 तरुणांनी शहरात फिरून सर्वेक्षणाचे काम सुरु केले. याला महिना झाल्यानंतर तरुणांनी पगाराची अपेक्षा व्यक्त केली. मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. पगार मिळेल, अशी शक्यता दिसत नसल्याने तरुणांनी मनपा अधिकाऱ्यांना विनंती केली. मात्र ही कंपनीची चूक असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले. काही तरुणांना दीड ते दोन हजार रुपये देण्यात आले. त्यामुळे बुधवारी काही तरुणांनी पोलीस आयुक्तांकडे या प्रकरणी फसवणूक होत असल्याचा आरोप केला आहे.
कंपनीचे व्यवस्थापक काय म्हणतात?
या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक विजय जाधनव म्हणाले की, तरुणांची नेमणूक करताना कामगिरीच्या आधारावर मानधन देण्याचे ठरले होते. त्यानुसार 20-22 रुपये प्रति फॉर्म असे मानधन देण्यात येत आहे. ज्यांना दीड ते दोन हजार मानधन मिळाले आहे, त्यांनी तेवढीच कामगिरी केली आहे. दहा हजार मानधन मिळण्यासाठी साडे चारशे फॉर्म भरावे लागतील. त्यानुसार पैसे दिले जातील, अशी प्रतिक्रिया कंपनी व्यवस्थापकांनी दिली आहे.
इतर बातम्या-