औरंगाबाद | बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी नागपूर मुंबई (Nagpur Mumbai) समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Highway) पहिला टप्पा येत्या 2 मे रोजी खुला होणार आहे. यानिमित्त नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज महामार्गाची पाहणी केली. एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर असून त्यांनी या महामार्गाची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केली. विशेष म्हणजे पहिल्यांदाच या समृद्धी महामार्गावर हेलीपॅडची व्यवस्था करण्यात आली. एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर समृद्धी महामार्गावर उतरवण्यात आलं. त्यांनी महामार्गावर उतरून पाहणी केली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना जोडणारा, महाराष्ट्राच्या प्रगतीचा आकृतीबंध असलेल्या या महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते सेलूबाजार आणि जालना ते शिर्डी यादरम्यानचा रस्ता पूर्णपणे तयार आहे.
वैजापूर-गंगापूर तालुक्यादरम्यान मंत्री एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर समृद्धी महामार्गावर पहिल्यांदाच उतरवण्यात आलं. मुंबईतून औरंगाबादकडे येताना एकनाथ शिंदे यांनी आपला हवाई मार्ग समृद्धी महामार्गाला समांतर असा ठेवला होता. या मार्गाने त्यांनी समृद्धी महामार्गाची पाहणी केली. वैजापूर-गंगापूर दरम्यानच्या इंटरचेंजवरही शिंदे यांनी ही पाहणी केली. दोन ते तीन वेळा त्यांनी हेलिकॉप्टर महामार्गावरून फिरवले. आंतरराष्ट्रीय दर्जाचा असा हा महामार्ग असून यावर हेलिकॉप्टर आणि विमानदेखील उतरवले जाण्याची शक्यता आहे. आज प्रथमच इथे हेलिकॉप्टर उतरवण्यात आलं.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गावर हेलिकॉप्टर उतरवल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हेदेखील तेथे उपस्थित होते. शिवसेना आमदार रमेश बोरनारे, आमदार संजय शिरसाट हे देखील येथे उपस्थित होते.
समृद्धी महामार्गावरील पहिल्या टप्प्याचे म्हणजेच नागपूर ते सेलूबाजार हा 210 किमीचे अंतर लोकांसाठी लवकरच खुले होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन होईल. तसेच पुढील महिन्यात जालना ते शिर्डी हा टप्पादेखील सुरु होईल. हा जागतिक दर्जाचा महामार्ग असून देशातला सर्वात मोठा महामार्ग आहे. या मार्गाद्वारे महाराष्ट्राच्या प्रगतीची द्वारं खुली होतील, असे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं.
इतर बातम्या-