Aurangabad : औरंगाबादचे कवी संदीप जगदाळे यांना पहिला केदारनाथ सिंह स्मृती सन्मान; वाराणसीत झाला गौरव
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणचे कवी संदीप जगदाळे हे स्वतः प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांच्या 'असो आता चाड' या कवितासंग्रहाला यावर्षी अनेक मानाचे पुरस्कार मिळालेत. हिंदीतील कवी केदारनाथ सिंह यांच्या नावाने मिळलेल्या पहिल्या पुरस्काराने या कवितासंग्रहाचे मोल अजून वाढवले आहे.
औरंगाबादः औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातल्या पैठणचे कवी संदीप जगदाळे (Sandeep Jagdale) यांच्या ‘असो आता चाड’ या कवितासंग्रहाचा पहिल्या केदारनाथ सिंह (Kedarnath Singh) स्मृती सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. वाराणसी येथील रैदोस मंदिर सभागृहात मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम झाला. हिंदीतील ज्येष्ठ कवी सितांशू यशश्चंद्र यांच्या हस्ते जगदाळे आणि अंचित पांडेय यांचा गौरव करण्यात आला. पंचवीस हजार रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हिंदी नियतकालिक साखीचे कवी केदारनाथ सिंह यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी दोन कवींना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यंदा पुरस्काराच्या पहिल्या वर्षी जगदाळे आणि पांडेय यांचा गौरव करण्यात आला. जगदाळे यांच्या ‘असो आता चाड’ या कवितासंग्रहात धरणग्रस्तांच्या प्रश्नांचा वेध घेण्यात आला आहे. तर पांडेय यांच्या ‘शहर पढते हुए’ या कवितासंग्रहाचा गौरव करण्यात आला.
जगदाळे प्राथमिक शिक्षक
पुरस्कार सोहळ्यानंतर संदीप जगदाळे, अंचित पांडेय यांच्यासह मान्यवरांचे कविता वाचन रंगले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ कवी आणि समीक्षक चंद्रकांत पाटील, ए. अरविंदाक्षन, अरुण कमल, मदन कश्यप, उपेंद्र कुमार, स्वप्नील श्रीवास्तव, पंकज चतुर्वेदी, सुभाष राय असे मान्यवर उपस्थित होते. कवी संदीप जगदाळे हे स्वतः प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांच्या ‘असो आता चाड’ या कवितासंग्रहाला यावर्षी अनेक मानाचे पुरस्कार मिळालेत. हिंदीतील कवी केदारनाथ सिंह यांच्या नावाने मिळलेल्या पहिल्या पुरस्काराने या कवितासंग्रहाचे मोल अजून वाढवले आहे.
‘असो आता चाड’मधील काही ओळी…
१
नकाशावरची निळसर नागमोडी रेघ
जी गोदावरी होती
माझ्या गावाला
जिवंत ठेवणारी
तिच्यावर मारण्यात आली आडवी रेघ
ती जेव्हा राक्षसी भिंत होऊन उभी राहिली
तेव्हा गावाचे श्वास तुटू लागले
तुम्ही मागची सगळी पानं नीट उलटून पाहा
त्या ऐन मध्यरात्री लाल किल्ल्यावरून
आकाशात कबुतरं सोडण्यात आल्यानंतर
नदीकाठच्या गावांचे खून पडू लागलेत.
२
पाण्यात मासे राहतात
खेकडे
मगर
कासव
अन् माझं गाव सुद्धा
भीती वाटते
कोणी माझा पत्ता विचारला तर
३
मला वाटलं होतं
मी होईन तुमच्यासाठी
मायाळू गारवा देणारं
वडाचं जुनाट झाड
पण मी किती दुबळा निघालो
मला देता येत नाही
तळहाता एवढीही सावली
४
माझ्या लेकरांनो
परतून या
मी तुमच्या हातात पुस्तक ठेवीन
पुस्तकाच्या वासानं नजरेत उमललेलं
कापसाचं फूल पहायचंय मला
५
जांभळं, बोरं, चिंचा, पेरू
दप्तरातून काढून माझ्यासमोर ठेवणारी ही पोरं
अशी अचानक का गायब होतात दरवर्षी?
मी कितीदा तरी पाहिलंय त्यांना
फरफटत पोटापासून भाकरीपर्यंतचं अंतर कापताना…
इतर बातम्याः