औरंगाबाद : शहरात शिवाजी नगर परिसरातील भाजी बाजारात झालेली जबरी चोरी (Aurangabad theft) सध्या शहरात मोठा चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे भर बाजारात पोलीसाच्या वेशात दोघे आले. एका निवृत्त मुख्याध्यापकाला गाठलं, एवढं सोनं घालून कुठं फिरताय म्हटले अन् बोलण्यात गुंतवलं. त्यांना अंगावरचं सोनं काढून ठेवायला सांगितलं. मुख्याध्यापकानं एकदा या दोघांवर संशयही घेतला. मात्र त्यांनी आवाज वाढवून तुम्हाला पोलीस स्टेशनलाच घेऊन जातो, अशी धमकी (Aurangabad crime) दिली. त्यानंतर हात चलाखी करत हे सोनं स्वतःच्या खिशात टाकलं आणि क्षणात तिथून पोबारा केला. मुख्याध्यापकाच्या हे लक्षात आल्यानंतर मात्र त्यांनी त्वरीत पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस (Police) भामट्यांचा शोध घेत आहेत.
शिवाजी नगरात राहणारे सुधाकर गोपीनाथ इंजे गुरुवारी भाजी, फळे खरेदी करण्यासाठी गेले होते. पाण्याच्या टाकीच्या दिशेने ते पायी जात होते. एवढ्यात पाठीमागून आलेल्या दोन दुचाकी स्वारांनी त्यांना अडवले. समोरील व्यक्तीने मी पोलीस आहे, असे सांगितले. तसेच एवढं सोनं अंगावर घालून तुम्ही कुठे फिरताय, असा प्रश्न विचारला. इंजे यांनी मी फळे खरेदी करण्यासाठी बाहेर निघालोय असे सांगितले. त्यावर दोघांनी त्यांना सोन्याचे दागिने काढून ठेवायला सांगितले. आधी ते दागिने काढून रुमालात बांधून खिशात ठेवा, असं म्हटले. इंजे यांनी एकदा थोडा संशय घेत, तुम्ही पोलीस आहात का आणि मलाच का अडवलंय असा प्रश्न विचारला.
इंजे यांनी संशय घेतल्यावर या भामट्यांनी जास्त मोठ्या आवाजात त्यांना धमकावलं. तुम्हाला बळजबरीने पोलीस ठाण्यात घेऊन जातो, असं दरडावलं. त्यामुळे इंजे यांनी घाबरून दोन अंगठ्या, सोनसाखळी रुमालात बांधून खिशात ठेवली. नंतर एका भामट्याने त्यांना रुमाल बाहेर काढायला लावला. दागिने कसे ठेवले ते पाहू म्हणत खिशात हात घातला व रुमाल हातात घेऊन असे नाही… तर असे ठेवायचे म्हणत हात बाहेर काढला. त्यानंतर दोघे तेथून निघून गेले.
दरम्यान हे दोघे तेथून निघून जातानाही चोरी झाल्याचं इंजे यांच्या लक्षात आलं नव्हतं. पुढे हातगाडीवर फळं घेतल्यानंतर पैसे देण्यासाठी त्यांनी रुमाल पाहिला असता त्यात दागिने नव्हते. त्यावेळी आपल्याला लुबाडल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या दोघांनी दहा व सहा ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या, 29 ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरून नेल्याचे इंजे यांनी सांगतिले. पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या-