औरंगाबादः उद्या सरकार पडणार, परवा सरकार पडणार, अशी स्वप्न ज्यांना रोज पडतात. त्यांना कळलही नाही की, महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे झाली, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devednra Fadanvis) आणि भाजपच्या नेत्यांना डिवचलं. औरंगाबाद येथील शिवसेनेच्या विराट (Shiv Sena Rally) सभेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा सत्तेत येण्याचं वक्तव्य करणाऱ्या फडणवीसांवर हल्लाबोल केला. तसेच एवढ्या वर्षांचा मित्र असलेला आता हाडवैरी बनला आणि शत्रू मित्र झालेत, असंही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटलं. शिवसेनेच्या हिंदुत्वावर टीका करणाऱ्यांनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सभेत सडेतोड उत्तर दिलं. तसंच औरंगाबादचं संभाजीनगर करणे तसेच शहरातील इतर विकास कामांवरून होत असलेल्या टीकांनाही उद्धव यांनी प्रत्युत्तर दिलं.
औरंगाबाद येथील सभेत देवेंद्र फडणवीसांवर तोंडसुख घेताना उद्धव ठाकरे म्हणाले ,’ रोज ज्यांच्या स्वप्नात उद्या सरकार पडणार, परवा सरकार पडणार असं वाटत होतं. पुन्हा येणार म्हणत होते… त्यांना कळलंही नाही की या महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे झाली आहेत. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळणं तेही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत इतके दिवस ज्यांच्याविरोधात आपण लढत होतो त्यांनी आपल्याला मान सन्मान देऊन राज्याचा विकास करण्यासाठी मदत केली. मित्र हाडवैरी बनला आणि शत्रू मित्र बनले आहेत… एक जमाना होता जेव्हा शिवसेना आणि भाजप देशाच्या कानाकोपऱ्यात अपृश्य होता. कारण आपण हिंदुत्वावर लढत होतो. कठीण काळात तुम्हाला शिवसेना लागली आणि आज केंद्रात सत्तेत आल्यानंतर तिच शिवसेना तुम्हाला वैरी भासू लागली.. ‘
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या काही दिवस आधी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादेत जलाक्रोश मोर्चा काढला होता. त्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आक्रोश करायचा असेल तर दिल्लीत जा.. पीकविमा कंपन्यांसाठी आहे की शेतकऱ्यांसाठी आहे? योजना अशा आणायच्या की शेतकरी नागवायचा. ज्या ज्या वेळेला अवकाळी येते… तेव्हा आम्ही तुमच्या बांधावर येतो… तुम्ही भुलता… मग आम्ही सत्तेत येतो आणि शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं आम्ही विसरतो. मला सांगा अच्छे दिन आले का हो?… निवडून आलं की पुन्हा धर्माचं राजकारण… कुठलीही तरी मशिद काढायची..’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले ,’
मी पंतप्रधान मोदींना विनंती करतो की देशातील प्रमुख पक्षांना, मुख्यमंत्र्यांना बोलवा आणि सांगा की कोणत्या मुद्द्यावर बोलायचं आणि सांगायचं. उज्ज्वला योजनेत गॅस सिंलिंडर मिळत नव्हता. बोंबाबोंब सुरु झाली की पुन्हा ही योजना सुरु केली. पेट्रोल-डिझेलबाबतही तसंच आधी किंमत वाढवायची आणि लोक ओरडायला लागले की थोडे कमी करायचे.