Aurangabad | औरंगाबादेत उद्या उद्धव ठाकरेंची विराट सभा, मास्कची सक्ती होणार का? शहरातला कोरोना रुग्णांचा आकडा किती?
उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी औरंगाबाद शिवसेनेतर्फे करण्यात येत आहे. या सभेला लाखो लोकांची गर्दी जमेल, असा दावा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.
औरंगाबादः शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची औरंगाबादमध्ये उद्या जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला लाखो लोकांची गर्दी होणार, असे दावे शिवसेनेच्या नेत्यांतर्फे करण्यात येत आहेत. राज्यातील वाढती कोरोनाची (Corona Patients) संख्या लक्षात घेता, एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी एकत्र येणं धोक्याचं ठरू शकतं. मात्र अद्याप राज्य शासनातर्फे सार्वजनिक ठिकाणी कोणतेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. तसेच आरोग्य विभागातर्फे मास्कची सक्तीही करण्यात आलेली नाही. आरोग्य मंत्री (Health Minister) किंवा राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांतर्फे केवळ मास्क लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. औरंगाबादमध्ये सध्या कोरोनाचे 12 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. मात्र अद्याप सभेच्या ठिकाणी मास्क अनिवार्य असल्याचे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत.
औरंगाबादेत कोरोचा रुग्ण किती?
जिल्ह्यात 05 जून रोजी कोरोनाचे तीन रुग्ण आढळले. सोमवारी 06 रुग्ण आढळले. यात शहरातील पाच आणि ग्रामीण भागातील एका रुग्णाचा समावेश आहे. याचबरोबर सक्रिय म्हणजेच उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आता 13 झाली आहे. यापैकी 12 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. गेले काही दिवस घाटी रुग्णालयात कोरोनाचा एकही रुग्ण दाखल नव्हता.
आरोग्य मंत्र्यांचं आवाहन काय?
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून केंद्र सरकारने देशातील पाच राज्यांना यासंबंधीचं पत्र पाठवलं आहे. यात महाराष्ट्र आणि केरळात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असल्याचे आढळून आले आहे. महाराष्ट्राचा विचार करता, मुंबई, मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर आणि पुणे या पाच जिल्ह्यात रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. उपरोक्त जिल्ह्यांची वाढती रुग्णसंख्या पाहता मास्क घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जास्तीत जास्त तपासण्या करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. सर्वांनी आता मास्क घातला पाहिजे. मास्क अनिवार्य केलेला नसला तरीही तो घालावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
सभेत लाखोंची गर्दी
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी औरंगाबाद शिवसेनेतर्फे करण्यात येत आहे. या सभेला लाखो लोकांची गर्दी जमेल, असा दावा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. मागील वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेलाही विक्रमी गर्दी झाली होती. त्यापेक्षाही जास्त लोकं शिवसेनेच्या सभेला जमतील. विरोधकांनी फक्त गर्दीचा आकडा मोजत बसावा, असा दावा शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. मात्र शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता, आरोग्य यंत्रणेचीही धाकधुक वाढली आहे.