धक्कादायकः जेसीबीनं तहसीलदाराला चिरडण्याचा प्रयत्न, वाळूमाफियाच्या कृत्यानं वैजापुरात खळबळ!
तहसीलदार गायकवाड यांच्या अंगावर जेसीबी यंत्र आल्याचे पाहून त्यांना बाजूला ढकलून सुरक्षा रक्षकाने त्यांच्याकडील परवानाधारक बंदूक जेसीबी यंत्रचालकावर रोखल्याचे धाडस दाखवले
औरंगाबादः नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांवर (Sand Mafia) कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारालाच जीवे मारण्याचा प्रयत्न औरंगाबादमधील वैजापुरात (Aurangabad vaijapur) झाला. तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या अंगावर वाळू तस्करांनी चक्क जेसीबी यंत्र (JCB) घालण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी पहाटे वैजापुरातील शिवना नदीपात्रात गायकवाड यांच्यावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. सुदैवाने या हल्ल्यातून ते बचावले. सुरक्षा रक्षकाने जेसीबी चालकावर बंदूक रोखली त्यामुळे तो घाबरला आणि जेसीबी यंत्र तेथेच सोडून पसार झाला. जवळपास अर्धा तास हा थरार चालला. सुरक्षा रक्षकाच्या आक्रमक भूमिकेनंतर वाळू माफिया अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले.
कुठे, कसा घडला प्रकार?
वैजापूर तालुक्यातील शिवना पदीपात्रात अनधिकृतरीत्या वाळूचे उत्खनन करुन वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती तहसीलदार राहुल गायकवाड यांना मिळाली होती. खासगी वाहनातून त्यांनी सुरक्षा रक्षक आरिफ पठाण यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना घेऊन लाखणी शिवारात शिवना नदीपात्रात गुरुवारी पहाटे कारवाईसाठी गेले. यावेळी विना क्रमांकाचा हायवा उभा असलेला त्यांना दिसला. तहसीलदारांच्या पथकाला पाहताच हायवा चालकाने तेथून पळ काढला. नदीपात्रात आणखी वाहने आहेत का, हे पाहण्यासाठी पथक पुढे गेले. काही अंतरावर जेसीबी उभे होते. कर्मचारी जेसीबीकडे येत असल्याने चालक फरार झाला. एवढ्यात त्याठिकाणी तीन बुलेटवर पाच ते सहा व्यक्ती आल्या. त्यांनी कारवाई न करण्याची विनंती केली. मात्र ही विनंती धुडकावून लावत तहसीलदारांनी वाहने तहसील कार्यालयात घेण्याचे आदेश दिले. पोलिसांना मदतीसाठी फोन केला. एवढ्यात वाळू तस्करांनी जेसीबी यंत्र सुरु करून जोरात पळवण्यास सुरुवात केली. ही वाहने अडवत असल्याने तस्काराने तहसीलदारांना दगड मारून अंगावर जेसीबी घालून टाक असे म्हणाले, तसेच मातीचा भराव उचलणारी बकेट त्यांच्या अंगावर घालण्याचाही प्रयत्न करण्यात आला, अशी आपबिती तहसीलदारांनी सांगितली.
सुरक्षा रक्षकाने वाचवले प्राण
तहसीलदार गायकवाड यांच्या अंगावर जेसीबी यंत्र आल्याचे पाहून त्यांना बाजूला ढकलून सुरक्षा रक्षकाने त्यांच्याकडील परवानाधारक बंदूक जेसीबी यंत्रचालकावर रोखल्याचे धाडस दाखवले. त्यामुळे या हल्ल्यातून राहुल गायकवाड बचावले. अंधाराचा फायदा घेऊन जेसीबी चालक आणि इतर लोक फरार झाले. पथकाने तस्करांच्या मालकीचा एक हायवा ट्रक आणि जेसीबी यंत्र जप्त करून शिऊर पोलिसांच्या ताब्यात दिले.
इतर बातम्या-