Aurangabad | मला कारणं नकोत, पाणीपुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे, औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कठोर सूचना
औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून आज मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची बैठक घेतली. त्यात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
औरंगाबादः मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा. कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा (water supply) झाला पाहिजे. नवीन योजना पूर्ण होईपर्यंत बराच कालावधी जाणार आहे. त्यामुळे सध्याच्या पाणी पुरवठा वितरणात किती आणि कसे पाणी वाढवून मिळेल, याकडे विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांना योग्य रीतीने पाणी मिळेल हे पहावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिल्या आहेत. औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक आज घेतली. यात औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai), पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय आणि जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण हे ऑनलाइन माध्यमातून हजर होते. गेल्या काही दिवसांपासून शहरातील पाणी प्रश्न पेटला असून याविरोधात नागरिकांनी अनेकदा आंदोलनं केली आहेत. राज्यात सर्वाधिक पाणीपट्टी औरंगाबादमधून वसूल केली जात असूनही शहरवासियांना सहा ते नऊ दिवसांनी पाणीपुरवठा होतो. त्यातही वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा जून्या जीर्ण झालेल्या जलवाहिनीत बिघाड झाल्यास हे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकही बारगळते. त्यातच उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. भाजपच्या नेतृत्वात नागरिकांनी नियमित पाणीपुरवठा होण्याकरिता मोठं आंदोलन केलं होतं.
औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या सूचना काय?
- नवीन पाणी योजना पूर्ण होईपर्यंत सध्याच्या पाणी वितरणात तातडीनं सुधारणा करण्यात याव्यात.
- पाणी वितरणात किती आणि कसे पाणी वाढवून मिळेल, याकडे विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांना पाणी मिळेल, हे पहावे.
- औरंगाबाद शहर पाणी पुरवठ्याच्या 1680 कोटी रुपयांची ही योजना गतीने पूर्ण व्हावी म्हणून या योजनेचा कालबध्द रीतीने आढावा मुख्यमंत्री संकल्प कक्षातून घ्यावा.
- या योजनेला वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य शासन काहीही कमी पडू देणार नाही, यातील उणिवा प्राधान्याने दूर करून शहरातील नागरिकांना व्यवस्थित पिण्याचे पाणी मिळेल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
- या नव्या पाणीपुरवठा योजनेचे कंत्राटदार संथ गतीने काम करीत असल्याच्या तक्रारी आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून त्यांनी कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखविल्यास विविध कायद्यांतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.