औरंगाबादः राजस्थान आणि गुजरातसह वायव्येकडून येणारे शुष्क उष्ण वारे (Heat wave) महाराष्ट्रात धडकले असून येत्या काही दिवसात याचे तीव्र परिणाम पहायला मिळतील, असा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवला आहे. महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भातील काही भागांना या उष्णतेच्या लाटेचा जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यातच औरंगाबादचा पारा चाळीसपर्यंत पोहोचला होता. यासह मराठवाड्यातील परभणी, नांदेड, लातूरचंही तापमान चाळीशीपर्यंत पोहोचलं होतं. त्यानंतर 21 मार्चपासून तापमानात काही प्रमाणात घट झाली होती. आठवडाभर ढगाळ वातावरणाचा अनुभव घेतल्यानंतर मार्च अखेर पुन्हा एकदा तापमानात वाढ होत आहे. तसेच येत्या चार दिवसात राज्यातील तापमानात आणखी दोन ते तीन अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे.
आज मंगळवारपासूवन पुढील चार दिवस राज्यावर उष्णतेच्या लाटेचं सावट असून मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचे तापमान 44 अंशांवर पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे बहुतांशी नागरिकांनी थेट सूर्यप्रकाशात जाणे टाळावे, असे निर्देश विभागातर्फे देण्यात आले आहे.
राज्यातील तापमान सतत वाढत असल्याने सूर्याचा यूव्ही इंडेक्स 11 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 28 मार्च रोजी तो महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये 9 ते 10 या उच्च पातळीवर होता. येत्या चार दिवसात हा इंडेक्स धोक्याच्या पातळीवर राहण्याची शक्यता आहे. ही श्रेणी मानवी शरीरासाठी अतिशय धोकादायक असून अतिनील किरणे थेट शरीरावर पडल्यास त्वचा जळणे, डोळ्यांचे विकार, मोतीबिंदू, त्वचेचा कर्करोग, उष्माघातासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
हवामान शास्त्रज्ञ के. एस. होसळीकर यांचे ट्वीट
Heat wave conditions very likely to prevail in isolated pockets of North Madhya Maharashtra and Marathwada from 30th March.
येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा . तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3ztCY भेट द्या pic.twitter.com/cu8e4zSzpM
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) March 28, 2022
यंदा मार्च महिन्यात म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट आली होती. 17 ते 19 मार्च दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट धडकली होती. 29 मार्च ते 1 एप्रिलदरम्यान दुसरी उष्णतेची लाट येणार आहे.पुढील चार दिवस याचे परिणाम जाणवतील. या लाटेचा सर्वाधिक प्रभाव विदर्भ आणि मराठवाड्यात जाणवेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात 28 मार्च रोजी अकोला शहराचे तापमान 42.3 अंश सेल्सियस होते. पुढील चार दिवसात ते 44 अंशांवर जाण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या-