जिच्यासोबत सात जन्मांचं स्वप्न पाहिलं तिलाच उद्ध्वस्त केलं, एकतर्फी प्रेमातून तरुणाचं टोकाचं पाऊल
औरंगाबादमध्ये एका तरुणाने रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून घेतले. त्यानंतर तरुणीला मिठी मारली. संबंधित प्रकार हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील फॉरेन्सिक सायन्स विद्यालयात घडला.
औरंगाबाद : प्रेमात खूप ताकद असते. प्रेमाने आपण जग जिंकू शकतो. प्रेम आपल्याला जगण्याचा अर्थ शिकवतं. एखाद्या व्यक्तीवर निस्सीम प्रेम करणं, त्याला मिळवण्यासाठी प्रयत्न करणं, त्याचं मन जिंकण्यासाठी मेहनत घेणं, त्या व्यक्तीसाठी जीवाची प्रचंड घालमेल होणं, आपली घालमेल पाहून समोरच्या व्यक्तीने आपलं प्रेम स्वीकारणं, किती सुंदर असतात या सगळ्या गोष्टी. प्रेम ही भावना खूप साजूक असते. त्यामुळे जोडीदाराला किंवा आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीला थोडा वेळ देता यायला हवा. पण काही लोक या गोष्टीचा विचार करत नाहीत. ते बऱ्याचदा एकतर्फी प्रेमात वेडे होतात आणि काटेरी झुडूपाचा मार्ग अवलंबत विद्रोह करतात. पण यामुळे पदरी फक्त नुकसान आणि निराशाच मिळते. औरंगाबादमध्ये अशीच एक घटना घडलीय.
औरंगाबादमध्ये एका तरुणाने रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून घेतले. त्यानंतर तरुणीला मिठी मारली. संबंधित प्रकार हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील फॉरेन्सिक सायन्स विद्यालयात घडला.
पूजा कडूबा साळवे असं पीडित तरुणीचं नाव आहे. तर गजानन खुशालराव मुंडे असं तरुणाचे नाव आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दोघांवरही उपचार सुरू आहेत. मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
गजानन याने एकतर्फी प्रेमातून संबंधित प्रकार केलाय. या घटनेत गजानन हा 60 टक्के भाजलाय. तर तरुणी ही 35 ते 40 टक्के भाजल्याची माहिती पोलसांकडून मिळाली आहे.
तरुणी आज दुपारी प्राचार्यांच्या कॅबिनमध्ये पीएचडीचे प्रोजेक्ट बनवत असताना संबंधित तरुण तिथे आला. त्याने सुरुवातीला स्वत:ला पेटवून घेतलं, त्यानंतर त्याने तरुणीला मिठी मारली.
या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात एकच खळबळ उडाली. तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. तसेच दोघांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. दोघांवर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.