नितेश राणे खूप छोटा… अजून समज यायची आहे; बच्चू कडू यांचा ‘प्रहार’
मुंबईच्या दौऱ्यानंतर जरांगे पाटील आणि माझा संबंध आला नाही. त्यानंतर त्यांच्यासोबत बोलणं झालं नाही. मी त्यांच्याकडे गेलो होतो. त्यावेळेस राजकीय विचार नव्हता, सामाजिक विचार होता. त्यांनी निवडणुका आमच्या सोबत लढवावी यासाठी मी त्यांना फोन करणार नाही. कारण आमचा तो स्वभाव नाही. आता ब्रह्मदेव खाली आला तरी आम्ही निवडणूक लढणारच. विचाराचा झेंडा समाधीनंतर सुद्धा जिवंत राहतो तो आम्ही कायम ठेवणार, असं बच्चू कडू म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. बच्चू कडू यांनी आज पुन्हा एकदा नितेश राणे यांच्यावर जोरदार प्रहार केले आहेत. नितेश राणे काय सांगणार? ब्रह्मदेवापेक्षा कोणी मोठा आहे का? ब्रह्मदेव आला तरी आम्ही अमरावतीतून माघार घेणार नाही. निवडणूक लढणार म्हणजे लढणारच. नितेश राणे अजून खूप छोटे आहेत. त्यांना अजून बरीच समज यायची आहे, असा हल्लाच बच्चू कडू यांनी चढवला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी हा हल्ला चढवला.
काल आमची नांदेडला एक बैठक झाली आणि जालना, अहमदनगर, बीड या जिल्ह्यांची आज संभाजीनगरला अशी प्रमुख तालुक्याची आणि संयुक्त बैठक आम्ही आज घेतलेली आहे. लोकसभेबाबत आपण काय केले पाहिजे आणि कशा पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे यासाठी ही बैठक आहे. जे मुद्दे या भागातले आहेत आहेत, जिल्ह्यातील ज्या समस्या आहेत. त्यावर आम्ही चर्चा करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यांमधील कार्यकर्ते त्यांना भरपूर त्रास झाल्याचं सांगत आहे. जालन्याच्या खासदारांनी प्रचंड त्रास दिला. काही जण सांगतात की निलेश लंके चांगले आमदार आहेत. कार्यकर्ते आम्हाला रिपोर्ट देत आहेत. त्यामुळे या सर्व भावना समजून घेऊन आम्हाला एखाद्या निष्कर्षापर्यंत यावं लागणार आहे, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.
पोस्टमार्टम झालेलं आहे
यावेळी बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेबाबतही भाष्य केलं. मला असं वाटतं की आता अमरावतीचं काही राहिलेलं नाही. पोस्टमार्टम झालेलं आहे. फक्त निकाल बाकी आहे आणि तो म्हणजे प्रहारचाच आहे, असं बच्चू कडू म्हणाले.
म्हणून उमेदवार दिला
रवी राणांची वागणूक ही अतिशय राग आणि संताप देणारी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल चीड आहे. मी स्वत: अपमान सहन करेल. पण असा अपमान सहन करण्यापेक्षा महायुतीतून बाहेर पडलेलं बरं असं कार्यकर्ते म्हणत आहेत. त्यामुळेच आमच्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही अमरावतीतून उमेदवार दिला आहे, असं ते म्हणाले.
बाहेर पडण्याची इच्छा नाही
जर तर वर विश्वास ठेवून चालणार नाही. आम्ही अमरावतीची जागा लढू असं म्हटलं नव्हतं. पण मोठ्या पक्षाने चुका केल्या त्यामुळे लढावं लागतंय. महायुतीतून बाहेर पडण्याची माझी इच्छा नाही. त्यांची तशी इच्छा असेल तर आनंदाने ते स्वीकारू, असं सूचक विधान त्यांनी केलं. आमची लढाई मैत्रीपूर्ण आहे. अमरावती जिल्ह्याबाबत पुढचा निर्णय महायुतीने घ्यावा. आमची लढत त्यांच्या विरोधात नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.