Beed | रुपाली चाकणकरांनंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावर कुणाची वर्णी? बीडच्या हेमा-रेखा स्पर्धेत!
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे. 2019 मध्ये रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
बीडः राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी राजीनामा दिल्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा कोणाच्या खांद्यावर येईल असा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अत्यंत महत्त्वाच्या या पदासाठी बीडमधून रेखा फड (Rekha Fad) आणि हेमा पिंपळे (Hema Pingle) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या दोन्ही नेत्या अनेक वर्षांपासून बीडच्या राजकारणात सक्रीय आहेत. आपापल्या स्तरावर पक्षश्रेष्ठीकडे बातचीत सुरू झाली आहे. मराठवाड्याला अद्याप राज्यस्तरीय पद मिळालं नाही, त्यामुळे आता बीड जिल्ह्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मराठवाड्यात बीड जिल्हा हा तसा राष्ट्रवादीचा गड मानला जातो. राष्ट्रवादीला भरभरून देणारा जिल्हा म्हणून बीडकडे पाहिले जाते. मंत्री धनंजय मुंडे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सहापैकी चार आमदार राष्ट्रवादीचे निवडून आणले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील सतत बीड जिल्ह्याचा दौरा करत असतात. त्यामुळे बीड जिल्ह्याची अपेक्षा वाढली आहे.
रुपाली चाकणकर यांचा राजीनामा
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. 2019 मध्ये रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली होती. रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षादेखील आहेत. हे पद अर्धन्यायिक स्वरुपाचे आहे. त्यामुळे या पदावरील व्यक्तींनी पक्ष संघटनेत राहू नये असा अलिखित नियम आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे सोडल्याचं सांगण्यात येत आहे. आता त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रदेशाध्यक्षाच्या शर्यतीत रेखा फड
बीडमधील नेत्या रेखा फड ह्या पूर्वी मनसेत बीड महिला जिल्हा प्रमुख पदी कार्यरत होत्या. गेली दहा वर्षांपासून त्या राष्ट्रवादीत कार्यकरत आहेत. त्यांनी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष पद देखील भूषविले आहे. लक्षवेधी आंदोलनामुळे त्या राज्यात चर्चित आहेत. त्यांच्या मागे महिलांचे मोठे संघटन आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये आक्रमक भूमिका घेतलेली आहे.
हिजाब समर्थनार्थ उतरलेल्या हेमा पिंगळेही स्पर्धेत
नुकत्याच झालेल्या हिजाब समर्थनार्थ मोर्चात नेतृत्व करणाऱ्या बीडच्या हेमा पिंगळे यादेखील प्रदेशाध्यक्ष पदाच्या चर्चेत आहेत. वकील असलेल्या हेमा पिंगळे या 20 वर्षांपासून बीडच्या राजकारणात सक्रिय आहेत. हेमा पिंगळे यांनी शिवसेनेत नऊ वर्षे काम केले होते. त्यावेळीही त्यांनी महिला आघाडी जिल्हा प्रमुख म्हणून काम करताना महागाईविरोधात आंदोलन केले होते. शासकीय अधिकाऱ्यांना बांगड्या भेट देऊन आंदोलनही केले होते. 2010 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
इतर बातम्या-