Beed | राज ठाकरेंचं पवारांवर सणसणीत भाषण, राष्ट्रवादी नेते Dhananjay Munde काय म्हणतात?
राज ठाकरे यांच्या भोंग्यांविषयीच्या भूमिकेवर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ' माझ्या दृष्टीनं मनसेनं भोंगे काढण्याच्या बाबतीत जे बोललंय त्यापेक्षा दोन वर्षांच्या कोविडच्या संकटानंतर पहात असताना, बेरोजगारांचा प्रश्न वाढलाय. त्यावर बोलले असते तर बरं झालं असतं.
बीडः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं भोंगे लावले काय आणि काढले काय…यामुळे आजच्या तरुणांना भाकर मिळणार आहे का? या मुद्द्याऐवजी मनसेने महाराष्ट्राच्या प्रगतीचा, रोजगाराचा मुद्दा उचलला असता तर बरं झालं असतं असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर प्रचंड टीका केली. शरद पवारांनीच (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) जन्मपासून जाती-पातीचं राजकारण सुरु केल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची प्रतिक्रिया काय येते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बीडचे पालक मंत्री,तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी टीव्ही9 कडे याबाबत प्रतिक्रिया नोंदवली. आपण समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य वारंवार करत असाल तर कुठेतरी इतिहासात तुमची नोंद प्रक्षोभक भाषणे करणारा म्हणून होईल, हे लक्षात ठेवा, असा इशाराही त्यांनी दिला.
भोंगे काढल्याने भाकरी मिळेल का?
राज ठाकरे यांच्या भोंग्यांविषयीच्या भूमिकेवर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘ माझ्या दृष्टीनं मनसेनं भोंगे काढण्याच्या बाबतीत जे बोललंय त्यापेक्षा दोन वर्षांच्या कोविडच्या संकटानंतर पहात असताना, बेरोजगारांचा प्रश्न वाढलाय. त्यावर बोलले असते तर बरं झालं असतं. भोंगे लावल्याने किंवा काढल्याने देश समृद्धीकडे वाटचाल करणार आहे का…त्या एका मुद्द्यामुळे समृद्ध होणार असेल तर तो योग्य मुद्दा ठरला असता. एकिकडे तेढ निर्माण करायची, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा ही चुकीची भूमिका आहे, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं.
‘एकदा समोरा-समोर बसूच, कोण जातीयवादी आहे पाहू’
शरद पवार हे जातीयवादी असल्याची तीव्र टीका राज ठाकरे यांनी केली. त्यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ’12 कोटी जनतेला आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना माझं आवाहन आहे. पवार साहेबांनी जात-पात धर्म पाहिला नाही. शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं 18 पगड जातींना घेऊन स्वराज्य उभारलं. रयतेचं राज्य निर्माण केलं. त्याच पद्धतीनं 56 वर्षाच्या राजकीय जीवनात पवार साहेबांनी सर्वांना सोबत घेऊन छत्रपतींच्या स्वराज्याला अभिप्रेत समाजकारण राजकारण केलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून माझी तर अपेक्षा आहे की, एकदा समोरासमोर बसू. कोण किती जातीय वादी आहे, हे पाहू.. जनतेच्या समोर सगळं येईल.’