बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आठ आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे. संघटीत गुन्हेगारी प्रकरणी मोक्का लावण्यात आला आहे. या निर्णयाचं सर्वच स्तरातून स्वागत केलं जात आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही या कारवाईचं समर्थन केलं आहे. पण धनंजय देशमुख यांच्यापासून भाजप नेते सुरेश धस आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एकच मागणी लावून धरली आहे. आरोपींना मोक्का लावला त्याचं स्वागत आहे. पण वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा कधी दाखल होणार? कराडला मोक्का कधी लागणार? असा सवाल या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल होणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनवणे, महेश केदार आणि प्रतीक घुले यांना मोक्का लावण्यात आला आहे. यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप आहे. यापैकी कृष्णा आंधळे अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल असल्याने त्याच्यावर अद्याप मोक्का लावण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर धनंजय देशमुख यांनी मीडियाशी संवाद साधत सर्वच आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी केली आहे. ही संघटीत गुन्हेगारी आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
सर्व आरोपींवर मोक्का लावलाय. पण खंडणी ते खून प्रकरण हे कट कारस्थान आहे. त्या सर्व आरोपींना 302 कलम लावलं पाहिजे. त्यांना फाशी दिली पाहिजे. ही आमची मागणी आहे, असं धनंजय देशमुख म्हणाले. वाल्मिक कराडवर मोक्का लावला नाही, याकडे त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर सर्वांवर मोक्का लावला पाहिजे. ही संघटित गुन्हेगारी आहे. सर्वांना फाशी झाली पाहिजे, अशी मागणीही धनंजय देशमुख यांनी केली.
भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आरोपींना मोक्का लावला हे मला माहीत आहे. मोक्का लावला यात नावीन्य काय? मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये तसं जाहीर केलं होतं. त्यानुसार त्यांनी मोक्का लावला. आरोपींना मोक्का लागणारच आहे. अजून बऱ्याच लोकांवर मोक्का लागणार आहे. आताशी थोड्या लोकांवर लागला आहे, असं सूचक आमदार सुरेश धस यांनी केलं आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पहिल्याच दिवशी आरोपींवर मोक्का लागायला हवा होता. इतका उशीर का केला? मुख्य आरोपीला अद्याप कुठे मोक्का लागला? त्याला मोक्का लागेल, त्याच्यावर 302चं कलम लागेल तेव्हाच लोकांचं समााधान होईल. वाल्मिकला मोक्का लावला आणि अटक केली तर बऱ्याच खूनाचा उलगडा होऊ शकतो. वाल्मिक कराडवरच सूत्रधार म्हणून चौकशीचा फोकस असला पाहिजे. पण ते दिसत नाही. त्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.
सुलक्षणा सलगर यांनीही या प्रकरणावर भाष्य केलंय. तुमचा जो सातवा आरोपी आहे, तो सापडला नाही. वाल्मिक कराड सरेंडर करतो. त्याला पोलिसांनी पकडलं नाही. हे गृहखात्याचं फेल्युअर आहे. नवरदेवाच्या वरातीसारखा आरोपी येतो. देशमुख कुटुंबीय म्हणतात आम्हाला अजूनही न्याय मिळाला नाही, असं सुलक्षा सलगर म्हणाल्या.
संजय राऊत यांनी ही केस मोक्का लावण्यासारखीच होती असं म्हटलंय. जनतेचा दबाव मोठा होता. त्यामुळे मोक्का लावण्याशिवाय पर्याय नव्हता, असं राऊत म्हणाले. तर, राज्यात खंडणी उकळण्याचे प्रकार सुरू आहेत. सरकारच्या आशीर्वादाने असे प्रकार सुरू असतील तर आपण काय मेसेज देतो? राज्यातील सर्व खंडणीखोरांचं कंबरडं मोडून काढलं पाहिजे. सरकारने हे काम केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.