VIDEO | पक्ष, निवडणुका, आमदारकी गेली खड्ड्यात, ‘संभाजीनगर’साठी राजीनामाही देईन, मुनगंटीवारांची फुल्ल बॅटिंग
औरंगाबादच्या नामांतराचा आग्रह धरताना मुनगंटीवार यांनी शिवसेनेला चांगलाच टोला लगावला. संभाजीराजेंचं शौर्य वर्णन करताना ते म्हणाले, 'गरम लोखंडी सळ्या डोळ्यात टाकतायत, नखं तोडतायत, चमडी काढतायत, तरी हा छावा म्हणतो, कितीही अत्याचार कर, मी धर्मांतर करणार नाही, माझा जीव गेला तरी चालेल. त्यांनाही सत्तेसाठी लाचार होता आलं असतं. पण ते झाले नाहीत....
औरंगाबादः औरंगाबादचं नाव संभाजीनगर (Sambhaji Nagar) कुणी करायचं, शिवसेना की भाजप (Shivsena Vs BJP)? हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने या प्रश्नाला चांगलीच हवा देण्यात आली आहे. सोमवारी विधानसभेत नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी अत्यंत त्वेषात हा मुद्दा मांडला. छत्रपती संभाजीराजे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने शिवसेनेने आणि महाविकास आघाडी सरकारने आजच यासंदर्भातील घोषणा करावी, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली. दहा हजार कोटी वाघ एकिकडे आणि संभाजीराजांसारखा छावा एकिकडे हे शौर्य तुम्हीही मानता. याबाबत कुणाचं दुमत नाही. मग नामांतराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाही ती पूर्ण करण्याची घोषणा का केली जात नाहीये, असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केला. तसेच या प्रक्रियेत केंद्र सरकारकडून काही मदत लागली तर मी स्वतः तेथील कार्यालयात उपस्थित राहीन. माझ्याकडून काही मदत झाली नाही तर मी राजीनामाही देईन, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या तोंडावर औरंगाबादाच्या नामांतरावरून शिवसेना चांगलीच अडकित्त्यात सापडणार हे दिसंतय.
काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?
सोमवारी विधानसभेत भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करावं, अशी मागणी केली. औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले तेव्हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी 1988 मध्ये विजयोत्सव साजरा केला. त्या उत्सवात त्यांनी संभाजीनगर असं नामांतर करण्याची घोषणा केली होती, मुनगंटीवारांनी सांगितलं ते म्हणाले, ‘ राज्य सरकारने यासंदर्भात 2016 मध्ये प्रस्ताव भाजप आणि बाळासाहेब ठाकरेंची जी जुनी शिवसेना होती, त्यांनी हा प्रस्ताव 13-06- 2016 ला दिला. 4 मार्च 2020 मध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली. डॉ. एसपी सावरगावकर सहाय्यक आयुक्त महसूल यांच्याकडेही हा प्रस्ताव आला. अनिल परब साहेब, तुम्ही संसदीय कामकाज मंत्री आहात. एखादं चांगलं काम अजून होऊ द्या, अशी विनंती सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
पक्ष, धोरणं, निवडणुका, आमदारकी गेली खड्ड्यात….
एकूणच औरंगाबादचं संभाजीनगर करण्यासाठी भाजप आक्रमक झाली असून मुनगंटीवार शिवसेनाला यावरून चांगलंच कोंडीत पकडलं. ते म्हणाले, ‘ मी तुम्हाला सभागृहात वचन देतो. तुम्हाला केंद्राची मदत या विषयाला लागत असेल तर मी स्वतः केंद्राच्या कार्यालयात उपस्थित राहतो. मी मदत करू शकलो नाही तर राजीनामा देईन. आयुष्यात निवडणुक लढणार नाही. पक्ष, धोरण, निवडणुका, आमदारकी गेली खड्ड्यात… असं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलं.
आदित्य ठाकरेंनाही करून दिली आठवण
संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांना उद्देशून बोलल्यानंतर मुनगंटीवार यांनी आपला मोर्चा शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे वळवला. ते म्हणाले, आदित्यजी तुम्हीदेखील यासंदर्भात आश्वासन दिलं होतं. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं 1988 चं भाषण पूर्ण करायचं म्हणजे शब्दाचा सन्मान आहे, हा त्या धर्मवीर संभाजीराजांच्या शौर्याचा… आजच तुम्ही ही घोषणा केली पाहिजे…
सत्तेसाठी संभीजीराजे लाचार झाले नाहीत…
औरंगाबादच्या नामांतराचा आग्रह धरताना मुनगंटीवार यांनी शिवसेनेला चांगलाच टोला लगावला. संभाजीराजेंचं शौर्य वर्णन करताना ते म्हणाले, ‘अध्यक्ष महोदय, 40 दिवस त्यांची झुंज सुरु होती. गरम लोखंडी सळ्या डोळ्यात टाकतायत, नखं तोडतायत, चमडी काढतायत, तरी हा छावा म्हणतो, कितीही अत्याचार कर, मी धर्मांतर करणार नाही, माझा जीव गेला तरी चालेल. त्यांनाही सत्तेसाठी लाचार होता आलं असतं. पण ते झाले नाहीत…. असा टोला मुनगंटीवार यांनी शिवसेनेला लगावला.
मुनगंटीवारांच्या विनंतीनुसार, विधानसभेच्या त्यात सत्रात यावर शिवसेना नेत्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र आगामी काळात यावर शिवसेनेच्याही तीव्र प्रतिक्रिया उमटू शकतात.
इतर बातम्या-