विश्वास नाही बसणार… शिवसेना, ठाकरे गट, भाजप आणि MIMचे नेते एकाच मंचावर; हास्यविनोदात रमले
संभाजीनगरातील एका कार्यक्रमात पहिल्यांदाच शिवसेना, ठाकरे गट, भाजप आणि एमआयएमचे नेते एकाच मंचावर आले होते. हे नेते हास्यविनोदात रमले होते. एकमेकांची टोपीही उडवत होते.
संभाजीनगर : एकमेकांना रोज पाण्यात पाहणारे, ऊठसूट एकमेकांवर टीका करणारे, प्रसंगी खालच्या शब्दात एकमेकांचा पाणउतारा करणारे नेते जर एकत्र एकाच मंचावर आले तर? असं होऊ शकतं का? असं तुम्हाला वाटत असेल. पण राजकारणात काहीही होऊ शकतो. थोड्यावेळापूर्वी एकमेकांच्या अंगावर धावून जाणारे नेते काही वेळात गळाभेट करतानाही दिसतात. यालाच राजकारण म्हणतात. संभाजीनगरातही राजकारणातील हाच प्रत्यय प्रत्येकाला अनुभवाला आला. lतुमचा विश्वास बसणार नाही, पण एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना, ठाकरे गट, भाजप आणि एमआयएमचे नेते एकत्र आले होते. नुसते एकत्र आले नाही तर हे नेते एकमेकांची टोपी उडवताना दिसत होते. हास्य विनोदात रमलेले दिसत होते.
घाटी रुग्णालयात अवयव दानाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला भाजप, शिवसेना, ठाकरे गट आणि एमआयएमचे नेते उपस्थित होते. या निमित्ताने हे नेते एकत्र आले होते. राज्याचे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन, राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, शिवसेना नेते आणि पालकमंत्री संदीपान भुमरे, मंत्री अतुल सावे आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे एकाच मंचावर होते. यावेळी गिरीश महाजन आणि अंबादास दानवे यांच्या मध्ये इम्तियाज जलील बसले होते. पालकमंत्री संदीपान भुमरे एकाच सोफ्यावर दाटीवाटीने बसले होते. त्यांच्यात हास्यविनोद सुरू होता.
दे टाळी
यावेळी इम्तियाज जलील हे गिरीश महाजन यांच्या कानात काही तरी सांगता दिसत होते. बराचवेळ दोघांमध्ये स्टेजवरच चर्चा सुरू होती. दोघांमध्ये हास्यविनोद रंगला होता. त्यानंतर इम्तियाज जलील हे अंबादास दानवे यांच्या कानात काही तरी सांगताना दिसत होते. दोघेही एकमेकांच्या वाक्यावर मान हलवताना दिसत होते. हास्यविनोद करत होते. गिरीश महाजन यांचा जेव्हा गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तेव्हा महाजन आणि जलील यांच्यात जोरदार हास्य विनोद झाला. त्यावर जलील यांनी महाजन यांना टाळीही दिली. उपस्थितांना मात्र हे वेगळच चित्रं पाहून आश्चर्य वाटत होतं.
अन् खसखस पिकली
त्यानंतर पाहुण्यांनी भाषणं केलं. यावेळी इम्तियाज जलील आणि महाजन यांच्या जुगलबंदी रंगली. घाटी रुग्णालयाचे वय 67 वर्ष आहे असे संयोजकांनी सांगितले. त्यावर गिरीश महाजन यांनी माझे वय 67 नाही अशी मिश्किल टिप्पणी केली. हाच धागा पकडून इम्तियाज जलील यांनी गिरीश महाजन यांचे वय 36 वर्ष असल्याचं म्हटलं. त्यामुळे एकच खसखस पिकली.