संभाजीनगरातून मोठी Update ! किराडपुरा राडा प्रकरण; 400 ते 500 जणांवर गुन्हा दाखल
संभाजीनगरातील राड्यानंतर वातावरणात तणावपूर्ण शांतता असली तरीही राजकीय आरोपांनी शहरात खळबळ माजली आहे.
दत्ता कनवटे, छत्रपती संभाजीनगर : नुकतंच नामांतर झालेल्या छत्रपती संभाजीनगरातील (Sambhajinagar) किराडपुरा (Kiradpura) प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. किराडपुऱ्यात मध्यरात्रीतून झालेल्या राड्याप्रकरणात तब्बल ४०० ते ५०० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संभाजीनगर पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, किराडपुऱ्यातील हाणामारी, जाळपोळ, दगडफेक प्रकरणी ४०० ते ५०० अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. राम नवमीनिमित्त विविध मंदिरांमध्ये आयोजित केलेले कार्यक्रम शांततेत पार पडले. किराडपुऱ्यातील राम मंदिरातही काहीही अनुचित प्रकार घडलेला नसून जन्मोत्सवही साजरा करण्यात आला.
काय घडलं रात्री?
शहरातील किराडपुरा भागातील राम मंदिर परिसरात काल रात्री दोन गटात प्रचंड राडा झाला. गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात आधी शाब्दिक चकमक सुरु झाली. या वादाचं रुपांतर भांडण, हाणामारीत झालं. त्यानंतर दोन गटाकडून तुफान दगडफेक करण्यात आली. तणावावर नियंत्रण मिळवण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही हल्ला झाला. पोलिसांच्या जवळपास १० ते १२ गाड्या जाळण्यात आल्या. जवळपास दोन ते तीन तास हा प्रकार सुरु होता. संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील, भाजप आमदार अतुल सावे हेदेखील रात्री घटनास्थळी पोहोचले. त्यांनीदेखील जमावाला शांत करण्याचे तसेच नागरिकांना शांततेचे आवाहन केले. सदर प्रकाराबाबत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
400 ते 500 अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल
किराडपुऱ्यात ज्या भागात हा राडा झाला , तो परिसर शहरातील जिंसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. या प्रकरणात 400 ते 500 जणांवर दंगल घडवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. दंगल घडवणे, खुनाचा प्रयत्न करणे, शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे या कलमाखाली हे गुन्हे दाखल करण्यात आलेत. 307, 353, 295, 332, 333, 143, 147, 148, 149, 153 या कलमाखाली गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
राजकीय वातावरण तापलं
संभाजीनगरातील राड्यानंतर वातावरणात तणावपूर्ण शांतता असली तरीही राजकीय आरोपांनी शहरात खळबळ माजली आहे. भाजप आणि एमआयएमच्या मिलिभगतीतून सदर प्रकार घडला असून त्यांना शहरात दंगल पेटवायची आहे, शहर अशांत करायचंय, असा आरोप ठाकरे गटाच्या शिवसेनेने केलाय. तर खा. इम्तियाज जलील यांनी सदर आरोप फेटाळून लावलेत. या प्रकाराची मला काहीही कल्पना नव्हती, मी घटनास्थळी गेलो तेव्हा माझ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचं खा. जलील यांनी tv9 शी बोलताना सांगितलं.