काय हे धंदे? चक्क मुख्य न्यायमुर्तींच्या नावाने गंडवण्याचा प्रयत्न! फ्रॉड होता होता राहिला, औरंगाबादेत काय घडलं?
ऑनलाईन फ्रॉडचे असंख्य प्रकार घडतात. फेक कॉलसह अनेक आयडीयाची कल्पना लढवून भामटे अनेक मोठ्या लोकांना गंडवतात. मात्र औरंगाबादमध्ये चक्क मुख्य न्यायमुर्तींच्या नावाचा वापर करुनच फसवणुकीचा घाट घालण्यात आला. नेमका काय आहे हा प्रकार? जाणून घेऊयात.
ऑनलाईन भामटे (Cyber Criminals) फसवणुकीसाठी ना ना त-हा वापरतात. काही जण फेक कॉल करतात. काही लॉटरी लागल्याचा, बक्षीस, इनाम अशी आमिष दाखवून भुलवतात. साध्या माणसांसोबतच अनेक शिकलेली, कर्ती आणि प्रसिद्ध व्यक्ती ही त्यांच्या जाळ्यात अडकतात नी फसतात. पण औरंगाबाद येथे घडलेला प्रकार तर फारच वेगळा आहे. एका बहाद्दराने चक्क मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तींच्या नावाने व्हॉट्सअप मॅसेज (WhatsApp Message) करुन फसवणुकीचा प्रयत्न केला खरा, पण फ्रॉड फ्रॉड होता राहिला. सहनिबंधकांच्या (Administrative Manager) एकूणच प्रकार लक्षात आल्याने आणि त्यांनी भामट्याच्या मॅसेजला तेवढ्यापुरतेच उत्तर दिल्याने पुढील प्रकार टळला. त्यानंतर कार्यालयीन चौकशीत हा प्रकार उघडा पडला. प्रकरणात शहरातील पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविला(registered FIR) आहे. सायबर भामटे कोणाच्या ही नावाचा वापर करुन तुम्हाला गंडवू शकतात. त्यामुळे तुम्ही सतर्क राहणे हाच पर्याय आहे.
डीपीला न्यायमुर्तींचा फोटो
औरंगाबाद खंडपीठाचे सहनिंबधक सुदेश कानडे यांच्या व्हॉट्सअपवर शनिवारी दुपारी एक संदेश आला. या व्हॉट्सअपच्या डीपीला मुख्य न्यायमुर्ती दीपांकर दत्ता यांचे छायाचित्र होते. समोरच्या व्यक्तीने व्हॉट्सअप मॅसेजच्या माध्यमातून त्याने कानडे यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. ‘ Hello, S. S. Kanade, How are you doing? Where are you at the moment?’ अशी त्याने विचारणा केली. डीपीवर खुद्द मुख्य न्यायमुर्तींचे छायाचित्र दिसल्याने कानडे यांनी त्या मॅसेजला तातडीने उत्तर दिले. आपण कार्यालयातच असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने त्यांना व्हेरी गुड असा रिप्लाय करत अधिकचा संवाद साधण्याचा प्रयत्न केला.
आणि दिली अमेझॉन पेची ऑफर
प्रशासन सहनिबंधक कानडे थेट मुख्य न्यायमुर्ती व्हॉट्सअप वर कसे काय चॅट करु शकतात, या विचारात गर्ग असतानाच, त्यांना व्हॉट्सअपवर पुन्हा संदेश येऊन धडकला तो ऑफरचाच. ‘आर यु फॅमिलीयर विथ अमेझॉन पे गिफ्ट कार्ड? अशी विचारणा करणारा मॅसेज येऊन धडकला. आता या मॅसेजमुळे कानडे थोडे संभ्रमित झाले. त्यांनी,’ नो माय लॉर्ड’असे उत्तर दिले. त्यानंतर चाचपणी करुन पठ्याने पुढे काही संदेश पाठवला नाही. पण कानडे यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
अन् फसवणुकीचे बिंग फुटले
कानडे यांनी या व्हॉट्सअप संदेशाचा अहवाल प्रबंधकांना सादर केला. प्रबंधकांनी ज्या क्रमांकावरुन संदेश आला होता, तो मोबाईल क्रमांक न्या.दत्ता यांचा होता का? त्यांनी मॅसेज पाठवला का? याविषयी मुंबईच्या कार्यालयाकडे विचारणा केली. तेव्हा असा कोणतचाच क्रमांक न्यायमुर्तींचा नसल्याचे समोर आले. मॅसेज तर त्यांनी पाठवण्याचा सवालच नव्हता. मुख्य न्यायमुर्तींच्या नावाने फसवणुकीचे हे प्रकरण गंभीरतेने घेत तात्काळ प्रबंधकांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.