BREAKING : ‘गटविकास अधिकाऱ्याने प्रत्येक विहिरीसाठी 12 तर इंजिनियरने 15 हजार मागितले’, पैसे उधणाऱ्या सरपंचाचा Tv9 मराठीवर गौप्यस्फोट
"मॅडम म्हटल्या आपण बाहेर थांबा. रोजगार सेवक आणि इंजिनियरला बोलावून घेतलं. त्यांना टक्केवारी सांगितली. माझ्याकडून 12 हजार घेण्याचं सांगितलं. खरंतर 12 हजार रुपये फक्त गटविकास अधिकारी मॅडम मंजूर करण्याबद्दल घेतात", असा मोठा गौप्यस्फोट सरपंच मंगेश साबळे यांनी केला.
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आज सरपंच मंगेश साबळे यांनी 2 लाख रुपयांच्या नोटांची उधळण करुन अनोखं आंदोलन केलं. त्यांच्या या अनोख्या आंदोलनाची दखल थेट मंत्र्यांनादेखील घ्यावी लागली. शेतात विहीर मंजूर करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्याकडून लाच मागितली जात असल्याचा आरोप या सरपंचांनी केला. अधिकाऱ्यांच्या या भ्रष्टाचाराविरोधात सरपंच मंगेश साबळे यांनी अनोखं आंदोलन केलं. या आंदोलनानंतर मंगेश साबळे यांनी Tv9 मराठीला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल मोठे गौप्यस्फोट केले.
“मी तीन महिन्यांपूर्वी जनतेतून अपक्ष सरपंच म्हणून निवडून आलो आहे. मी 25 वर्षांचा आहे. विहिरींचा विषय हातात घेऊनच मी निवडून आलो. भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उचलून मी घराघरांत जाऊन प्रचार केला. भ्रष्टाचार बंद करेन, नियमानुसार हा विषय चव्हाट्यावर आणून मी निवडणूक लढवली आणि लोकांनी हजारांची लीड देवून मला निवडून दिलं”, अशी माहिती मंगेश साबळे यांनी दिली.
“मी गोरगरिबांसाठी उपक्रम सुरु केला की, आपण फक्त गरिबांच्या विहिरी करायच्या. पैशावाल्यांच्या आतापर्यंत बऱ्याच विहीरी झाल्या. मी त्या 20 विहीरी तयार केल्या आणि गटविकास अधिकाऱ्यांकडून मनरेगाच्या माध्यमातून सरकार विहिरींसाठी जी 4 लाखांचं अनुदान देतं त्यासाठी मी फाईली दाखल केल्या. त्यावेळेस रोजगार सेवकाला माझ्यासोबत घेऊन गेलो होतो, असं मंगेश साबळे यांनी सांगितलं.
मॅडमला सांगितलं की, मी सरपंच आहे, गरीब लोकांचं कामं करतो, आपण सहकार्य करुन हे कामं करुन द्यावी, अशी विनंती केली. पण मॅडम म्हटल्या आपण बाहेर थांबा. रोजगार सेवक आणि इंजिनियरला बोलावून घेतलं. त्यांना टक्केवारी सांगितली. माझ्याकडून 12 हजार घेण्याचं सांगितलं. खरंतर 12 हजार रुपये फक्त गटविकास अधिकारी मॅडम मंजूर करण्याबद्दल घेतात. त्यानंतर टीएस काढायचं, इस्टिमेट करायचं, जिओ टॅगिंग करायचं याचे 15 हजार रुपये इंजिनियर वेगळे घेतात. त्यानंतर जिओ टॅगिंगला अधिकारी परत 5 हजार रुपये घेणार. परत शेवटी दोन-अडीच लाखांचं कुशल बिल काढण्यासाठी दहा हजार रुपये घ्यायचे. ही एक साखळी आहे. ही बऱ्याच वर्षांपासून बऱ्याच पंचायत समितींमध्ये सुरु आहे. याकडे कुणाचंच लक्ष नाही, असं मंगेश साबळे म्हणाले.
शेतकऱ्यांना माहिती आहे गरिबांच्या विहीरी होत्या. मंगेश साबळे हे करु शकतो. त्यामुळे जीवावर उधार होऊन दहा-दहा हजार रुपये त्यांनी मंगळसूत्र उधार ठेवून काहींनी व्याजाने माझ्याकडे दिले. पण तरीसुद्धा 40 ते 50 हजार रुपये आणायचे कुठून यासाठी मी हा पराक्रम केला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सहा महिन्यांपूर्वी एका अधिकाऱ्याला लाच पकडताना पकडवून दिलं
सहा महिन्यापूर्वी पंचायत समितीमध्ये सराटे म्हणून अधिकारी होते. ते 10 हजारांची लाच घेताना एनसीबीच्या जाळ्यात अडकले. पण अटकेनंतर दोन दिवसांनी अनावधानाने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मेंदूची नस फाटल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. आम्ही जाळं टाकून त्यांना पकडून दिलं होतं. ते प्रकरणही विहीरीचंच होतं. एनसीबीच्या जाळ्यात अडकूनसुद्धा हे भ्रष्टाचारी थांबत नसेल तर मी काय करायचं? अधिकारी मरुन सुद्धा भ्रष्टाचार सुरु राहिला त्यामुळे यांचा बाजार उठवण्यासाठी वेगळ्या माध्यमातून विरोध करायचा विचार केला, असं मंगेश साबळे यांनी सांगितलं.
मला एनसीबीच्या पोलीस अधीक्षकांचा फोन आला होता. त्यांनीसुद्धा मला सांगितलं की, तुम्ही आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही जाळ्यात अडकवून हा सगळा प्रकार उघडकीस आणला असता. पण सहा महिन्यांपूर्वी अधिकारी पकडून सुद्धा भ्रष्टाचार थांबत नसेल तर आपण कितीवेळेस प्रशासनासमोर लाचार व्हायचं? 4 लाखांमध्ये 60 हजार रुपये हे अधिकारी खात असतील तर दीड-दीड लाख यांना पगार असेल आणि यांनी पेन्शन मागायचं मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं? असा सवाल त्यांनी केला.
उधळलेल्या नोटा गेल्या कुठे?
मी दोन लाख रुपये उधळले. माझ्यासोबत फक्त एक कॅमेरामॅन होता. मी त्याला एकाही नोटला हात लावू नको असं सांगितलं होतं. हे दोन लाख रुपये आपण बीडीओ मॅडमसाठी आणले आहेत. ते इथेच सोडायचं, असं मी त्याला सांगितलं. पण तो म्हणाला, अरे आपण अर्धे तरी परत नेऊ. पण मी त्याला नाही म्हटलं. अर्ध्या नोटा उडून गेल्या. काही चहावाल्यांनी जमा केले. पण आम्ही एक रुपयासुद्धा घेतला नाही, असं संरपंचांनी सांगितलं.
मी या विषयी तक्रार करणार आहे की, माझे पैसे परत द्या. मला नुकसान भरपाई द्यावं. ते शेतकऱ्यांचे पैसे आहेत. मी त्या मॅडम विरोधात तक्रार करणार आहे. तुमच्यामुळे मी ते आंदोलन केलं. माझ्या गोर-गरीब शेतकऱ्यांचे दोन लाख रुपये गेले. त्यामुळे त्याची नुकसान भरपाई करावी, असा नुकसानीचा दावा मी करणार आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.