Aurangabad | शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरुन वाद; एमआयएम, मराठा क्रांती मोर्चाची वेगळी मागणी
पुतळ्याचे उद्घाटन शिवाजी महाराज यांच्या वंशजांच्या हातानेच केले जावे, असा पवित्रा मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. एमआयएमनेदेखील हीच भूमिका घेतली आहे.
औरंगाबाद : संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj Statue) यांच्या अश्वारुढ पुतळ्याची औरंगाबादेत स्थापना करण्यात येत आहेत. हा पुतळा शहरातील क्रांती चौक येथे स्थापन करण्यात आला असून येत्या 10 फेब्रुवारी रोजी अनावरण केले जाणार आहे. मात्र त्याआधीच येथे पुतळ्याच्या उद्घाटनावरुन मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे. पुतळ्याचे उद्घाटन शिवाजी महाराज यांच्या वंशजांच्या हातानेच केले जावे, असा पवित्रा मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. एमआयएमनेदेखील (MIM) हीच भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे महापालिका या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हाताने करण्याचे नियोजन करत आहे. याच मुद्द्यावरुन आता उद्घाटनाचा वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
उद्घाटन शिवाजी महाराज यांच्या वंशजांच्या हस्तेच व्हावे
काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे औरंगाबाद शहरात आगमन झाले. शहरातील क्रांती चौक येथे शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा स्थापन करण्यात येत असून त्याचे काम सुरु आहे. या पुतळ्याचे येत्या 10 फेब्रुवारी रोजी रितसर उद्घाटन करण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच उद्घाटनाच्या मुद्द्यावरुन वाद सुरु झालाय. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपतींच्या पुतळ्याचे उद्घाटन हे शिवाजी महाराज यांच्या वंशजांच्या हस्तेच व्हावे असा पवित्रा घेतलाय. तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चानेदेखील हीच भूमिका घेतली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्घाटन करण्यास विरोध दर्शविला आहे.
10 तारखेला पुतळ्याचे उद्घाटन केले तर विरोध करु
तर दुसरीकडे भाजपने वेगळीच भूमिका घेतली आहे. येत्या 10 फेब्रुवारीऐवजी पुतळ्याचे उद्घाटन 19 फेब्रुवारी रोजी केले जावे, असे मत भाजपने मांडले आहे. 19 ऐवजी 10 तारखेला पुतळ्याचे उद्घाटन केले तर आम्ही त्याचा विरोध करु अशी भूमिका भाजपने घेतली आहे. या सर्व धांदलीमध्ये औरंगाबाद पालिका पुतळ्याचे उद्घाटन 10 फेब्रुवारीलाच करण्याचे नियोजन आखत आहे. नियोजनानुसार पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
औरंगाबादेत वाद पेटण्याची शक्यता
दरम्यान, पुतळ्याच्या उद्घाटनावरुन एमआयएम, मराठा क्रांती मोर्चा तसेच भाजपने वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. तर पालिका आपली चौथी भूमिका घेऊन कामाला लागलेली आहे. याच कारणामुळे शिवाजी महाराज पुतळा उद्घाटनाचा वाद पेटण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या :