औरंगाबाद : जेव्हापासून एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी हे औरंगाबादेत (Aurangzeb) आले आणि औरंगाबादेतल्या औरंगजेबाच्या कबरीवर गेले तेव्हापासून औरंगजेबावरून राज्यात वाद सुरू आहे. मात्र औरंगाबादच्या सभेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी दुसऱ्या एका औरंगजेबाबरोबर घडलेला प्रसंग सांगत काही सवाल केले आहेत. पंतप्रधानांनी (PM Modi) चांगलं सांगितलं की आपल्या देशात विरोधी पक्ष मूळ मुद्द्यांना बगल देऊन वेगळ्याच मुद्द्यावर बोलतोय…बरोबर आहे. पण त्यांना माहिती नाही का की महाराष्ट्रात विरोधी पक्ष त्यांचा भाजप आहे. भाजप इथे कुणाला तरी सुपारी देतो, मग भोंगे आठवतात, हनुमान चालिसा आठवते. आज काश्मिरी पंडितांची हत्या सुरु आहे. असाच एक सैनिक होता तो सैनिक आपल्या देशाकडून लढत होता. त्याने अनेक अतिरेकी मारले होते. तो सुट्टीवर निघाल्यानंतर त्याचं अपहरण झालं. काही दिवसानंतर त्याचा छिन्नविछिन्न झाले मृतदेह सापडला. त्याचं नाव होतं औरंगजेब… तेव्हा तुम्ही तो आमचा नाही तो मुसलमान आहे असं म्हणणार आहात का? असा सवाल त्यांनी भाजपला केला आहे.
तसेच शिवसेनाप्रमुखांनी मुसलमानांचा मुसलमान द्वेष करा असं कधीही सांगितलं नाही. शिवाजी महाराजांनीही अन्य धर्माचा आदर केला आहे. बाळासाहेबांनीही हा देश हाच माझा धर्म म्हणून बाहेर पडण्यास सांगितलं. पण धर्माच्या नावाने आमच्या अंगावर कुणी आला तर सोलल्याशिवाय राहणार नाही. भाजपच्या कोणत्या प्रवक्त्याने प्रेषितांचा अपमान केल्यानंतर अरब राष्ट्रांनी आपल्याला गुडघ्यावर आणलं. देशानं काय केलं आहे, देशानं का माफी मागायची… भाजपचा प्रवक्ता म्हणजे देशाचा प्रवक्ता होऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या भूमिकेनं जा पुढे… आज मी तुम्हाला जाहीरपणे विचारतो ज्या भाजपच्या तिनपाट प्रवक्त्यामुळे देशावर नामुष्की ओढावली ते तुम्हाला मान्य आहे का… अशा पद्धतीने तुम्ही जाणार असाल आणि आम्ही तुमच्या मागे फरफटत यावं हे होणार नाही.
तर बाबरीच्या जागेवर मंदिर बांधायचं धाडस तुम्ही केलं नाही. कोर्टातून आदेश आल्यानंतर तुम्ही जनतेसमोर झोळ्या पसरवल्या. मग तुम्ही हिंदुत्वासाठी काय केलं. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. भाजपचे जे बेलगामपणे सुटलेले प्रवक्ते आहेत त्यांच्यावर लगाम घालावा… तुम्ही आमच्यावर वेडीवाकडी टीका केली तर आमचाही संयम सुटेल. तुमच्याच भाषेत तुम्हाला उत्तर मिळेल. हा भगवा फडकवायला बरा म्हणून घेतलेला नाही. हा वारकऱ्यांचा, छत्रपतींचा, हिंतुत्वाचा भगवा आहे. इकडे हनुमान चालिसा बोलायची आणि तिकडे जाऊन शिव्या द्यायच्या हे बरोबर नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.