गोवंश असल्याचा संशय आल्याने तरुणांनी गाडी अडवली, गो तस्करांनी घेतला गोरक्षकाचा बळी
नांदेड जिल्हयातील किनवट तालुक्यातील इस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. गो तस्करानी केलेल्या हल्ल्यात एका गोरक्षकाचा मृत्यू झालाय, तर सहा जण जखमी झाले.
राजीव गिरी, प्रतिनिधी, नांदेड : गोरक्षणाचे काम काही तरुण करतात. कारण त्यांना गोवंश वाचवायचा आहे. गोवंश वाचला तर माती टिकेल. माती टिकली तर देशाला चांगले अन्नधान्य मिळेल. ही यामागची संकल्पना आहे. त्यामुळे गायी कत्तलीसाठी जात असतील, तर हे तरुण त्याला आळा घालतात. गोवंशाची कत्तल होण्यापासून वाचवतात. नांदेड जिल्हयातील किनवट तालुक्यातील इस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. गो तस्करानी केलेल्या हल्ल्यात एका गोरक्षकाचा मृत्यू झालाय, तर सहा जण जखमी झाले. काल रात्री साडेअकराच्या सुमारास मलकजाम गावाजवळ ही घटना घडली. घटनेनंतर या भागात तणावाची परिस्थिती निर्माण झालीय.
पुलावर अडवली बोलेरो गाडी
किनवट तालुक्यातील शिवणी आणि चिखली गावातील सात गोरक्षक तेलंगणा राज्यात एका कार्यक्रमासाठी गेले होते. परत येताना त्यांना अप्पारावपेठजवळ पांढऱ्या रंगाची पिकअप बोलेरो दिसली. त्यात गोवंश असतील, असा संशय या तरुणांना आला. त्यांनी त्या गाडीचा पाठलाग सुरू केला. पुढे मलकजाम पुलावर त्यांनी बेलोरो गाडी अडवली.
एक ठार, सहा जण जखमी
गाडी तपासणीसाठी शेखर रापेल्ली आणि महेश कोंडलावार हे दोघे उतरले. तेव्हा बोलेरो गाडीतील चार जणांनी अचानक हल्ला केला. नंतर दुचाकीवरदेखील सहा ते आठ जण आले. या सर्वांनी लाठी-काठी, दगड तसेच चाकूने हल्ला केला. यात शेखर रापेल्ली या तरुण ठार झाला. चार जण गंभीर जखमी झाले, तर दोघांना किरकोळ दुखापत झालीय. यातील चार जखमीना नांदेडला उपचारासाठी हलवण्यात आलंय.
चार आरोपींची ओळख पटली
हे सर्व तरुण गोरक्षणाचे काम करायचे. सर्व जण विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आहेत. या प्रकरणी जखमी तरुण संतोष पेंटेवार याच्या फिर्यादीवरून इस्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चार आरोपींची ओळख पटल्याचे पोलिसांनी सांगितले. उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे.
शिवणी, चिखलीत तणावाची स्थिती
या घटननंतर इस्लापूर, शिवणी, चिखली गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे नांदेड पोलिसासह केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जलद कृती दलाचे पथक तैनात करण्यात आले. दरम्यान आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही. अशी भूमिका घेत गावकरी आणि हिंदुत्वादी संघटनांनी शिवणी येथे रास्ता रोको केलाय.