Special Report : अंबादास दानवे यांनी खोक्यांचा मुद्दा समोर केला, तर सत्तार यांनी दोन बायकांचा मुद्दा उकरून काढला, कसा तो बघा
अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेच्या शपथपत्रात आपलं कुटुंब सात जणांचं असल्याचं दाखवलंय. दुसऱ्या आणि सहाव्या रखान्यात दानवे यांच्या दोन पत्नींची नावं आहेत.
औरंगाबाद : ठाकरे गट आणि शिंदे गटाचा संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागलाय. दोन्ही गट वैयक्तिक पातळीवर येऊन टीका करू लागलेत. शिवसेनेत दोन गट पडल्यापासून औरंगाबाद जिल्ह्यातसुद्धा दोन गट निर्माण झालेत. एका बाजूला आहेत चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे आणि उदयसिंह राजपूत, तर दुसऱ्या बाजूला आहेत शिंदे गटाचे अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, संदीपान भुमरे आणि रमेश बोरनारे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या या दोन गटात शाब्दिक वाद सुरू झालाय.
काल अंबादास दानवे यांनी खोक्यांचा मुद्दा पुन्हा एकदा उकरून काढला. दानवे म्हणाले, खोक्यांचा विषय खरा आहे का. जो अकराशे वर्गणी देत होता तो ११ हजार देतो. एक लाख देतो मग खोक्यांचा विषय खोटा थोडा आहे. ग्रामपंचायतीला कवडी देत नव्हता. आता एक दोन नव्हे पाच-पाच लाख देतो.
सोसायटीलाही एक घेऊन जा, दोन लाख घेऊन जा. पाच लाख घेऊन जा सांगतो. मग, खोके खरेच आहेत. खोटं थोडीचं आहे, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. वाणी साहेब असते तर बुटानचं मारलं असत त्यांनी. हीच लायकी यांची राहिलेली आहे.
अंबादास दानवे यांनी बुटाची भाषा केल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी दोन बायकांचा मु्द्दा उकरून काढलाय. ज्यांनी ज्यांनी दोन-दोन बायका केल्या. त्यांना बुटानंच मारायला पाहिजे. अधिकृत दोन बायको करण्याचं हिंदू धर्मात आहे का, असा प्रश्नच त्यांनी विचारला.
अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेच्या शपथपत्रात आपलं कुटुंब सात जणांचं असल्याचं दाखवलंय. दुसऱ्या आणि सहाव्या रकान्यात दानवे यांच्या दोन पत्नींची नावं आहेत. बुटांचा मुद्दा दानवे यांनी पुढं करत सत्तार यांनी दोन पत्नींचा मुद्दा पुढं केलाय. शिंदे-ठाकरे गटाची ही राजकीय लढाई आता कौटुंबीक पातळीपर्यंत येऊन ठेपली आहे.