शरद पवार यांच्या बीडमधील एन्ट्रीआधीच धनंजय मुंडे यांना मोठा धक्का, विश्वासू नेत्याने सोडली साथ; आज राष्ट्रवादीत प्रवेश
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज बीडमध्ये तोफ धडाडणार आहे. शरद पवार आज बीडमधून अजितदादा गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधणार असल्याचं सांगितलं जात आहे.
बीड | 17 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज बीडमध्ये सभा आहे. त्यांच्या सभेला अर्ध्या लाखाहून अधिक लोक येणार असल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवार पहिल्यांदाच बीडमध्ये येत आहेत. त्यामुळे त्यांच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा हा बालेकिल्ला आहे. मात्र, पवार बीडमध्ये धनंजय मुंडे यांना चेकमेट देण्यासाठी या मतदारसंघात येत असल्याचं सांगितलं जात आहे. पवार यांची दुपारी सभा सुरू होईल. त्यापूर्वीच धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची माने चौकात दुपारी 12 वाजता सभा होणार आहे. त्यापूर्वीच बीडमध्ये राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. परळी येथील धनंजय मुंडे यांचे खंद समर्थक बबन गित्ते हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. बबन गित्ते यांचं बीडमध्ये मोठं प्रस्थ आहे. ते मुंडे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. मात्र, मुंडे मंत्री असूनही गित्ते यांनी त्यांची साथ सोडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
गित्ते हे दुपारी शरद पवार यांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यावेळी गित्ते यांचं भाषण होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. गित्ते यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे मुंडे यांना मोठा चेकमेट असल्याचं बोललं जात आहे. बबन गित्ते हे धनंजय मुंडे यांच्यासमोरचा नवा पर्याय असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे आगामी काळात धनंजय मुंडे यांनी डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बीआरएसला गळती सुरू
तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या पक्षाला राज्यात चांगलं यश मिळत आहे. अनेकांचा त्यांच्या पक्षात प्रवेशही होत आहे. काही माजी आमदार आणि माजी खासदारांनीही चंद्रशेखर राव यांच्या पक्षात प्रवेश केल्याने बीआरएसला बळ मिळण्यास सुरुवात झाल्याचं चित्र होतं. पण आता बीआरएसला गळती लागल्याचंही दिसून येत आहे. बीआरएसचे नेते शिवराज बांगर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. बांगर हे आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
आधी शक्तीप्रदर्शन, नंतर सभा
शरद पवार हे औरंगाबादहून थेट बीडला येणार आहेत. बीडला आल्यावर ते जाहीर सभेच्या ठिकाणी थेट जाणार नाहीत. पवार आधी बीडमध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहेत. बीडच्या महालक्ष्मी चौकातून पवार यांची रॅली निघणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून ते शक्तीप्रदर्शन करणार आहेत. त्यानंतर सभेला संबोधित करणार आहेत. पवार यांच्या सभेला अर्ध्या लाखाहून अधिक लोक येणार असल्याचं सांगितलं जात आहे. एवढ्या लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांचीच ही सभा आहे. ही मविआची सभा नाही. त्यामुळे पवार यांच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.