Aurangabad | औरंगाबादेत कुत्रा घोटाळ्याची चर्चा, 28 हजार कुत्रे पकडण्यासाठी कोट्यवधींचा खर्च? माजी महापौर प्रमोद राठोड यांचा आरोप काय?
शहरातील भटक्या कुत्र्यांना मार्गी लावण्यासाठी महापालिकेतर्फे एखाद्या एजन्सीला काम दिले जाते. महापालिकेच्या हद्दीतील मोकाट कुत्रे पकडून त्यांची निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करण्यात येते.
औरंगाबादः महापालिका निवडणुका (Municipal Corporation Elections) जवळ येत आहेत, तसे आजी-माजी सत्ताधारी परस्परांचे घोटाळे बाहेर काढत आहेत. औरंगाबादमधील माजी महापौर प्रमोद राठोड (Pramod Rathod) यांनी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेविरोधात (Shivsena) कुत्रा घोटाळा केल्याचा आरोप केलाय. मागील पाच वर्षात शिवसेनेसंबंधित एका एजन्सीने शहरातील भटके कुत्रे पकडण्यासाठी तब्बल अडीच कोटींपेक्षा जास्त खर्च केल्याचा आरोप राठोड यांनी केला आहे. 2015-16 मध्ये महाराणा एजन्सीने हे काम हाती घेतले. दोन वर्षानंतर एजन्सीने ते काम सोडले तरीही त्यांच्याच संबंधित इतर एजन्सीचे नाव दाखवून शिवसेनेसंबंधित व्यक्तींनीच या कंत्राटाचा फायदा घेऊन या कामासाठी कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप प्रमोद राठोड यांनी केलाय. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई केली जावी, अशी मागणी प्रमोद राठोड यांनी केली आहे.
प्रमोद राठोड यांचा आरोप काय?
औरंगाबाद महापालिकेतील कुत्रा घोटाळ्यासंदर्भात बोलताना प्रमोद राठोड म्हणाले, ‘ गोकुळसिंग मलके या आमच्या नगरसेवक यांनी महापालिकेतून कुत्र्यासंदर्भात माहिती मागवली होती. मागील पाच वर्षात किती कुत्रे पकडले, किती खर्च झाला.. एजन्सी कोणती आदीसंदर्भात आलेली माहिती ही खळबळजनक आहे. 5 वर्षात 28 हजार 600 कुत्रे पकडले. यावर जवळपास 3 कोटी खर्च. धक्कादायक म्हणजे कुत्रे पकडण्याचं काम ज्या एजन्सीकडे देण्यात आलं होतं, ते संशयास्पद आहे. यापैकी एक महाराणा एजन्सी, ही सुरुवातीचे 2015-16 ला कुत्रे पकडण्याचे काम करत होती. त्यानंतर राजस्थान, झारखंड येथील एजन्सींची नावं आहेत. महाराणा एजन्सी आधी कुत्रे पकडत होती. पण नंतर तिने महापालिकेला मनुष्यबळ पुरवण्याचं काम केलं. जवळपास 1500 माणसे महापालिकेला या एजन्सीने पुरवली आहेत. ही महाराणा एजन्सी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची आहे. माणसे पुरवण्याचं काम मिळाल्यानंतर कुत्रे पकडण्याचं काम सोडल्याचं दाखवलं मात्र तसं प्रत्यक्षात घडलं नसल्याचा दाट संशय आहे. इतर एजन्सीच्या माध्यमातून कुत्रे पकडण्याची सोय सुरु ठेवली. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.
इतर एजन्सीही शिवसेनेच्याच?
प्रमोद राठोड यांच्या आरोपांनुसार महाराणा एजन्सीने दोन वर्षानंतर कुत्रे पकडण्याचं काम सोडलं असलं तरीही त्यानंतरच्या तीन वर्षात ज्या एजन्सींनी काम केलंय, त्यादेखील शिवसेनेनंच उभ्या केल्या आहेत. यात ब्लू क्रॉस सोसायटी, पुणे, होम अँड अॅनिमल ट्रस्ट, झारखंड, उषा इंटरप्रायजेस, राजस्थान, अरिहंत वेल्फेअर सोसायटी, उस्मानाबाद यांचा समावेश आहे. या एजन्सीदेखील शिवसेनेच्या असल्याचा आरोप प्रमोद राठोड यांनी केला आहे.
कुत्रे पकडण्याचे काम काय?
शहरातील भटक्या कुत्र्यांना मार्गी लावण्यासाठी महापालिकेतर्फे एखाद्या एजन्सीला काम दिले जाते. महापालिकेच्या हद्दीतील मोकाट कुत्रे पकडून त्यांची निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करण्यात येते. पकडून आणलेल्या कुत्र्यांना कोंडवाड्यात तीन दिवस ठेवून त्यांची सुश्रुषा करण्यात येते. नंतर व्ही आकाराच्या कानाचा तुकटा करण्यात येवून पकडण्यात आल्याच्या ठिकाणी श्वानांचे पुनर्वसन करण्यात येते. एकूण पाच वर्षात या कामासाठी महापालिकेने 2 कोटी 66 लाख 11 हजार रुपये खर्च केल्याचा आरोप करण्यात येतोय.