कोरोनाने पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ, औरंगाबाद विद्यापीठ अनाथ विद्यार्थ्यांचं पालकत्व स्वीकारणार
कोरोनाने पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क माफ करण्याचा स्तुत्य निर्णय औरंगाबाद विद्यापीठाने घेतला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पालकांच्या पाल्यांचे विद्यापीठ पालकत्व स्वीकारणार आहे.
औरंगाबाद : कोरोना विषाणू संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे अनेकांनी रोजगार गमावला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपल्या कुटुंबातील प्रिय व्यक्तींना गमावलं. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं याअगोदर फी कपातीचा निर्णय जाहीर केला. कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी पालक गमावले आहेत त्यांची 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी फी कपातीचा निर्णय राज्यातील विविध विद्यापीठांनी घेतला. पाठोपाठ आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानेही कोरोनाने पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतलाय. विद्यापीठाच्या या निर्णयामुळं विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
कोरोनाने पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ
कोरोनाने पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क माफ करण्याचा स्तुत्य निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पालकांच्या पाल्यांचे विद्यापीठ पालकत्व स्वीकारणार आहे.
प्रयोगशाळा आणि ग्रंथालयाच्या फी मध्ये 50 टक्के फी माफी तसंच न झालेल्या महोत्सवाची आणि कार्यक्रमाची पूर्णपणे फी माफी करण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतला आहे.
विद्यापीठाचं 7 कोटी रुपयांचं नुकसान होणार
विद्यापीठाने घेतलेल्या फी माफीच्या निर्णयामुळे सात कोटीपेक्षा जास्त रुपयांचं नुकसान डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठास सहन करावं लागणार आहे.
11 कोर्सेस बंद करण्याचा विद्यापीठाचा निर्णय
विद्यार्थ्यांअभावी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील काही अभ्यासक्रम कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील 5 शैक्षणिक वर्षांत अभ्यासक्रमाच्या क्षमतेपेक्षा विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या कमी दिसून आली. त्यामुळे विविध अभ्यासक्रमांतील विषयांसाठीच्या प्राध्यापकांची नेमणूक आणि इतर सोयीसुविधांच्या खर्चाचा बोजा विद्यापीठावर पडत होता.
विद्यार्थ्यांनी कमी प्रमाणात पसंती दर्शवल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील ११ कोर्सेस बंद करण्यात आले आहेत. या कोर्सेसमध्ये एमएस्सी (मॅथेमॅटिक्स), एमटेक इंजिनिअरिंग (कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग), डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट (डीबीएम), सर्टिफिकेट कोर्स ऑफ प्रोफीसेन्सी एन रशियन, बीए इंटरनॅशनल (जर्नालिझम अँड आर्ट अँड सायन्स युनिस्को कोर्स), बीएड, एमएड इंटिग्रेटेड कोर्स, डिप्लोमा इन टीव्ही प्रोडक्शन अँड बेसिक फिल्म मेकिंग, बॅचलर ऑफ डान्स, बीए (म्युझिक), बॅचलर ऑफ प्रिंटिंग टेक्नॉलॉजी अँड ग्राफिक्स आर्ट (बीपीटी अँड जीए), एमएससी नॅनो टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
(DR babasaheb Ambedkar Marathawada university Aurangabad Decided fee Waiver for those Student Who lost their parents due to Corona)
हे ही वाचा :