डॉ. राजन शिंदेंचं नेमकं काय झालं? एका रक्तांकित खुनाचा चक्रावून टाकणारा घटनाक्रम, घराला आरसा दाखवणारी घटना, वाचा सविस्तर

सामाजिक वलयांकित व्यक्तीमत्त्व ते घरातील विकोपाचे वाद अन् त्यातून झालेली डॉ. शिंदे यांची पाशवी हत्या.. या सर्वांतून सामान्य नागरिकाने, घर नावाच्या चार भिंतीत राहणाऱ्या माणसानांनीही आत्मपरीक्षण करण्याचा बोध घ्यावा, हीच अपेक्षा...

डॉ. राजन शिंदेंचं नेमकं काय झालं? एका रक्तांकित खुनाचा चक्रावून टाकणारा घटनाक्रम, घराला आरसा दाखवणारी घटना, वाचा सविस्तर
शहरातील समाजिक, शैक्षणिक व्यक्ती डॉ. शिंदेंच्या पाशवी हत्येचं गूढ अखेर उकललं.
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 8:31 PM

औरंगाबाद:  डॉ. राजन शिंदे. औरंगाबाद शहरातील मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विभागप्रमुख. एक सामाजिक, राजकीय वलय प्राप्त. विद्यार्थीप्रिय , सामाजिक संघटनांच्या कार्यक्रमात पुढाकार घेणारे, कॉलेजमध्येही विविध उपक्रमांमध्ये अग्रेसर अशा व्यक्तीची अत्यंत क्रूरपणे हत्या झाल्याची बातमी धडकली अन् औरंगाबाद शहरातील अनेक कॉलेज, विद्यापीठ, त्यांचे राहते घर असलेला सिडको परिसर, अख्ख्या शहरातले पोलीस स्टेशन, माध्यमांची कार्यलयं हादरली. व्हॉट्सअपवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या डॉ. शिंदेंचे फोटो पडले.. विद्यार्थ्यांचे घोळके, प्राध्यापकांचे ग्रुप, समाज कार्यकर्त्यांचे समूह, पत्रकार, नेते, राजकारणी असंख्य लोकांमध्ये 11 ऑक्टोबरच्या सकाळी एकच विषय होता. एवढ्या मोठ्या व्यक्तीमत्त्वाची एवढ्या क्रूरपणे… इतक्या निर्दयीपणे हत्या का व्हावी… घरातली काडी इकडे की तिकडे हलली नाही.. चोरी नाही, दरोडा नाही… पण या माणसाचा जीव जाताना घरातल्या कुणालाही पत्ता कसा लागला नाही… या सगळ्या चर्चेत एक गोष्ट दबक्या आवाजात बोलली जात होती..डॉ. शिंदेंना जवळून जाणणाऱ्यांमधली ही चर्चा. तिचा उलगडा पुढे होईलच… पण त्या दिवशी सामान्य औरंगाबादकरांना दिसत होती ती फक्त हत्येची क्रूरता… एखाद्या पशुलाही लाजवेल एवढ्या भीषणतेने  दिसेल तिथे शरीराची चिरफाड केलेलं डॉ. शिंदे यांचा छिन्नविछिन्न केलेला, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह….

Dr. Shinde Murder, Aurangabad

11 ऑक्टोबरला डॉ. शिंदे यांच्या खुनाने अवघ्या औरंगाबाद शहराला हादरा बसला.

काय झालं 11 ऑक्टोबरला पहाटे?

डॉ. शिंदे यांचा खून झाल्याचे उघड झाले, त्या दिवसापासूनचा घटनाक्रम अत्यंत गूढ, रहस्यमय अन् प्रश्नांचं मोहोळ घेऊन मिरवणारा असाच आहे. डॉ. शिंदे यांच्या घरात 10 ऑक्टोबरच्या रात्री त्यांचे आई-वडील, पत्नी मनीषा , विधीसंघर्ष बालक आणि मुलगी – असे कुटुंबीय होते. कुटुंबियांनी अगदी सुरुवातीला दिलेल्या माहितीनुसार, 11 ऑक्टोबर रोजी एरवी सकाळी नऊ वाजता उठणारा विधीसंघर्ष बालक पहाटे पाचच्या सुमारास उठला. हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडिलांचा मृतदेह पाहून त्याने बहीणीला उठवले. दोघांनीही आईला अजिबात कल्पना दिली नाही.. दोघेही रुग्णवाहिका आणण्यासाठी बाहेर पडले. मात्र रुग्णवाहिका चालकाने आधी पोलीसांना कळवण्याची सूचना दिली. त्यानंतर या दोघांनीही चिश्तीया पौलीस चौकी गाठली. तिथे कुणी उपस्थित नव्हते, म्हणून नियंत्रण कक्षाला फोन करून सदर घटनेची माहिती दिली. या प्रवासात  विधीसंघर्ष बालकाने एका गाडीला धडक दिली. त्यानंतर आपली कार तेथेच सोडून तो रुग्णवाहिका आणण्यासाठी पुढे पळाला… पण हे सर्व घडत असताना डॉ. शिंदे यांच्या पत्नीला कानोकान खबरही नव्हती. त्या गाढ झोपेत होत्या…

murder investigation, Aurangabad

डॉ. शिंदे यांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी असंख्य लोकांचे जबाब नोंदवले.

10 ऑक्टोबर रात्री काय घडलं?

सिडको येथील संत तुकोबा नगरात डॉ. राजन शिंदे, मुलगी चैताली (20), विधी संघर्ष बालक (17), सासरे हरिभाऊ आणि सासू चंद्रकला हे राहतात. रविवारी संध्याकाळी साडे नऊ वाजता घरातील सासू-सासरे, जेवण करून त्यांच्या खोलीत झोपी गेले. मुलगी, मुलगा जागेच होते. राजन हे मित्राला भेटण्यासाठी बाहेर गेले होते. रात्री साडे अकरा वाजता ते बाहेरून जेवण करून घरी आले. त्यानंतर पती-पत्नींनी रात्री एक वाजेपर्यंत टीव्ही पाहिला. मनीषा रात्री एक वाजता खोलीत झोपण्यासाठी गेल्या. मुलांनाही झोपायला सांगितले. पती राजन हे हॉलमध्ये टाकलेल्या अंथरुणावर पडून टीव्ही पाहत होते. पण मनीषा सकाळी सव्वा सहा वाजता उठून हॉलमध्ये आल्या, तेव्हा त्यांना डॉ. राजन हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांच्या शेजारी मुले नव्हती. त्यानंतर त्यांनी मुकुंदवाडी पोलीस स्टेशन गाठले.

Dr. Shinde investigation, Aurangabad

डॉ. शिंदे यांच्या खुनाच्या घटनेतील पुरावा शोधण्यासाठी पोलिसांनी अहोरात्र शर्थीचे प्रयत्न केले.

पोस्टमॉर्टेम रिपोर्टनं आणखी हादरवलं…

11 ऑक्टोबर रोजी घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनाही मोठा शॉक बसला. घरात कुणीही बाहेरची व्यक्ती आलेली नसताना, शिंदे यांना कुणी मारलं. कुटुंबियांवर संशय घ्यावा तर आपल्याच व्यक्तीला एवढ्या निर्दयीपणे कोण मारेल, असा विचारही येतो. दुसऱ्या दिवशी 12 ऑक्टोबर रोजी आलेल्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टने तर अवघी यंत्रणा हादरली. रिपोर्टनुसार, मारेकऱ्याने दोन हत्यारांचा वापर केला. त्यातील एक हातोडा किंवा लोखंडी रॉडसारखे होते. त्यातील लोखंडी रॉडचा एक तडाखा डोक्याच्या मागील बाजूला केला, तर कपाळावर तीन घाव घातले. हा तडाखा व घाव शक्तीनिशी डॉ. शिंदेंना प्रतिकार करणे कठीण गेले असावे. त्यानंतर मारेकऱ्याने धारदार हत्याराने त्यांचा डावा कान तीन चतुर्थांश कापला. मग गळा मणक्यापर्यंत म्हणजे दीड ते पावणेदोन इंच खोलवर चिरला.चार ते पाच सेंटिमीटर खोलवर वार करत हाताच्या नसा कापण्यात आल्या. हातोड्याच्या फटक्याने अर्धवट बेशुद्धावस्थेत गेलेल्या डॉ. राजन यांच्या छातीवर मारेकरी काही मिनिटे बसला. छातीवर बसूनच त्याने त्यांच्या दोन भुवयांच्या अगदी अचूक मध्यभागी धारदार हत्याराने एक बारीक आकाराचा वार केला. ती जखम ठळकपणे दिसेल अशी काळजी मारेकऱ्याने घेतली असावी. एखादी लोखंडी, लाकडी वस्तू कापण्यासाठी वापरले जाणारे हे धारदार हत्यार असावे. आता दोन्ही हत्यारे शोधणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान होते.. 12 ऑक्टोबरपासून हीच दोन हत्यानं शोधण्यासाठी पोलिसांची तपासचक्र फिरू लागली..

Aurangabad police

कुटुंबीय, नातेवाईक, शेजाऱ्यांवर प्रश्नांच्या फैरी झाडूनही हाती सुगावा न आल्याने पोलिसही चक्रावले होते.

संशयित ढळढळीत समोर.. पण पुराव्यांअभावी बोलती बंद…

बातमीत आधी उल्लेख केल्याप्रमाणे खून झाल्याचे उघड झाल्यापासून शिंदे यांना ओळखणाऱ्यांमध्ये एक गोष्ट दबक्या आवाजात बोलली जात होती. सामाजिक वर्तुळात सक्रीय असलेल्या शिंदे यांच्या घरात मात्र तितका ताळमेळ नव्हता. कुटुंबीयांमध्ये मोकळेपणा नव्हता. कदाचित यातील काही गोष्टी विकोपाला गेल्या अन् हा प्रकार घडला असावा.. हे ढळढळीत सत्य दिसत होतं.. पण आपल्याकडची कायदे यंत्रणाच एवढी कडेकोट आहे की, पुरावे सापडल्याशिवाय कोणालाही स्पष्टपणे बोलता येत नाही. शिंदे यांच्या खुन्याने तर घर सुईचाही पुरावा दिसू नये, अशी खबरदारी घेतली होती. त्यामुळे पोलिसांसमोर आव्हान होतं ते पुरावे शोधण्याचं. तोपर्यंत कुटुंबातील सर्वजण, नातेवाईक, मित्र-परिवार, विद्यापीठातील प्राध्यापक अधिकारी, या सर्वांची चौकशी सुरु झाली.

पत्नी मनीषांच्या बदलीचा वेगळाच अँगल

दरम्यान, खून झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच डॉ. शिंदे यांची पत्नी मनीषा यांनी घेतलेली भूमिकाही मोठी संशयास्पद ठरली. मनीषा या विद्यापीठाच्या उस्मनाबाद केंद्रात प्राध्यापिका आहेत. त्यांनी औरंगाबाद विद्यापीठात बदलीसाठीचा अर्ज डॉ. शिंदे यांच्या दुसऱ्या दिवशीच केला. दरम्यान मनीषा यांच्या जबाबातही विसंगती आढळून आली. मनीषा यांच्या जबाबानुसार, सकाळी 6.45 वाजता झोपेतून उठल्यावर पती रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यानंतर पोलिसांच्या जबाबातही त्या यावरच ठाम होत्या. मात्र त्यांच्या मोबाइलच्या सीडीआरमधून वेगळीच माहिती हाती लागली आहे. त्यांनी घटनेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मनाबाद येथील उपकेंद्रातील एका सहकाऱ्याशी सोमवारी पहाटे 5.12 मिनिटांनी संपर्क साधून पतीचा खून झाला असून आज ड्युटीवर येणार नसल्याचे कळवले. त्यानंतर शेजाऱ्यासह इतरांशी 6 वाजेपूर्वीच अनेक कॉल केले असल्याचे निष्पन्न झाले.

Shinde murder, Aurangabad

निकटवर्तीयाने खुनासाठी वापरलेली शस्त्र विहिरीत फेकल्याचे सांगताच विहिरीतील गाळ उपसण्यात आला.

निकटवर्तीयाने सांगितले विहिरीत फेकली शस्त्रे

औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अवघी यंत्रणा खुन्याच्या तपासकार्यात गढली होती. 13 ऑक्टोबर रोजी एका निकटवर्तीयाने शिंदेंचा खून केलेली शस्त्र बाजूच्याच विहिरीत फेकल्याचे सांगितले. मात्र ती विहिर खोल आणि कचरा व दुषित वायूने भरलेली होती. त्यावेळी पोलिसांनी त्यात वरवर शोध घेतला. आणि तपास दुसऱ्याच अँगलने सुरु केला. पत्नी मनीषा यांच्या उस्मानाबादेतील कार्यालयात चौकशी करण्यात आली. एका क्षणाला तरी संशयित गुन्ह्याची कबूली देईल, असे वाटत होते. पण तसे घडले नाही. त्यामुळे आता पुरावे शोधण्याशिवाय पर्याय नव्हता. अखेर 16 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी त्या विहिरीतील पाणी, कचरा उपसण्याचे काम सुरु केले. या दरम्यान संशयिताने विहिरीत शस्त्रे फेकल्याचे सांगूनही पोलिसांनी हे काम तत्काळ हाती का नाही घेतले, याबद्दलही प्रश्नचिन्ह उभे राहिले. संशयिताने कबूली दिली नाही. पुरावे मिळाले नाही तरीही परिस्थितीजन्य पुराव्यांआधारे पोलीस गुन्ह्याची उकल करू शकले असते.. पण तसे झाले नाही. त्यामुळे माध्यमांकडूनही पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले…

Aurangabad investigation

विहिरीतील गाळ काढण्यासाठी औरंगाबाद पोलीस अन् मदत कर्मचाऱ्यांनी तीन दिवस, दोन रात्र अखंड मेहनत घेतली.

तो हिटलर… संपवला एकदाचा.. अन् शस्त्रांचा तपास सुरु..

पोलिसांच्या चौकशीत 15 ऑक्टोबर रोजी एका निकटवर्तियानेच डॉ. शिंदे हे घरात हिटलरसारखे वागत होते. त्यामुळेच त्यांना एकदाचं संपवलं… असा जबाब दिली अन् ती शस्त्रे विहिरीतही टाकल्याचे सांगितले. त्यानंतर शनिवार 16 ऑक्टोबरला दुपारी 3 वाजल्यापासून सुरु करण्यात आला होता. महापालिकेच्या मदतीने पाच एचपीचे दोन आणि दोन एचपीचे दोन अशा चार पंपांद्वारे पाणी उपसण्याचे काम 18 ऑक्टोबर रोजी दुपारपर्यंत सुरु होते. यासाठी 20 ते 25 कर्मचारी कामाला लागले होते. अखेर 18 ऑक्टोबरला दुपारी ही शस्त्रे सापडली. व्यायाम करण्यासाठीचा डंबेल, भाजी चिरण्याचा चाकू अन् रक्ताने माखलेला टॉवेल विहिरीच्या तळाशी सापडला.. एवढ्या प्रयत्नानंतर पुरावे सापडल्यानंतर पोलिसांनी अखेर आरोपीला ताब्यात घेतले..

Aurangabad police

11 ऑक्टोबरपासून सुरु झालेले डॉ. शिंदे यांच्या खुन्याचा तपास अखेर 18 ऑक्टोबर रोजी संपला.

ऐतिहासिक तपास अन् कौटुंबिक सलोख्याची गरज

डॉ. शिंदे यांच्या खुन्याचा, पुराव्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना तब्बल 8 दिवस लागले. संशयित ढळढळीत समोर दिसत असताना पुराव्यासाठी अहोरात्र, शर्थीचे प्रयत्न करावे लागल्याने हा तपास औरंगाबादच्या गुन्हेगारी अन् पोलिस तपासाच्या इतिहासात अधोरेखित होईल.. यासोबतच आणखी एक गोष्ट प्रकर्षाने मांडली जातेय ती म्हणजे सामान्य नागरिकानं यातून घेतलेला धडा.. हा तपास पूर्ण होईपर्यंत सामान्य नागरिकांमध्ये एकच चर्चा होती. शिंदे यांच्या घरातील, कुटुंबातील वातावरणाची. सामाजिक, राजकीय अन् महाविद्यालयीन प्रांगणात नावाजलेले व्यक्तीमत्त्व असलेले डॉ. शिंदे यांचे कुटुंबियांशी फार पटत नव्हते. घरात त्यांच्या शब्दाला किंमत नव्हती… याउलट त्यांच्याबद्दल बोलताना एका निकटवर्तीयाने तर त्यांना थेट हिटलरचीच उपमा दिली. घरातील, कुटुंबातील व्यक्तीला हिटलर कुणी म्हणतही असेल… पण त्यामागील भावना एवढी तीव्र, एवढी निर्दयी, एवढी पाशवी तर नसावी… याची काळजी आपणच घेतलेली बरी. डॉ. शिंदे यांच्या हत्येतून सामान्य औरंगाबादकरांनी तरी हाच धडा घेतलाय.

इतर बातम्या- 

गुरमीत राम रहीमसह 5 दोषींना आजन्म जन्मठेपेची शिक्षा, कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

भयंकर ! पुण्यात आठवीच्या मुलीची हत्या, तो वार करत होता तेव्हा लहान मुलं खेळत होती, मोठे घाबरुन पळाले 

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.