Big News | संभाजीनगर अस्वस्थ, सामाजिक सलोख्याला धोका, उद्योजकांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, काय आहे मागणी?
Sambhajinagar News | जी २० परिषदेनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर शहराची प्रतिमा उंचावली असून ती कायम ठेवण्यासाठी वेळीच पुढाकार घेण्यात यावा, असे आवाहन उद्योजकांनी केले आहे.
छत्रपती संभाजीनगर | औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर शहरातील एक मोठा गट अस्वस्थ असल्याने शहरात गेल्या काही दिवसांपासून तणावाचं वातावरण आहे. नामांतर विरोधी संघटनांनी मागील आठवड्यापासून उपोषण सुरु केलं आहे. तर छत्रपती संभाजीनगर हे बदललेलं नाव आम्ही स्वीकारणारच नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यामुळे नामांतराला पाठींबा देणाऱ्या तसेच नामांतर विरोधी अशा सर्वच विचारधारांच्या प्रमुखांना एकत्र बोलावून हा विषय मार्गी लावावा, असं आवाहन शहरातील उद्योजकांनी केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्योजक, व्यापारी संघटनेने या आशयाचं पत्र पाठवलं आहे. छत्रपती संभाजीनगर फर्स्ट या संस्थेने हे पत्र पाठवलं असून मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून शहरातील अस्वस्थता कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांना काय पत्र?
राज्य तसेच केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून नामांतर तसेच इतर राजकीय घडामोडींवरून शहर आणि परिसरात परस्पर विरोधी वक्तव्य आणि निवेदने प्रसारीत केली जात आहे. त्यामुळे सामान्य जनतेत अस्वस्थता निर्माण होऊ शकते. शहरांमध्ये कोणत्याही प्रकारची सामाजिक अशांतता निर्माण होणे कुणालाही परवडणारे नाही. या अशांततेचा पहिला परिणाम दुर्दैवाने व्यापार, उद्योग, पर्यटन तसेच सामान्य माणसांच्या दैनंदिन रोजीरोटीवर होतोय, हे या पत्रातून निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
सलोखा अबाधित ठेवण्याची विनंती
उद्योजकांनी लिहिलेल्या पत्रात शहरातील सलोखा अबाधित ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र अशा अधिकाराचा वापर करताना शांतपणे जीवन जगण्याच्या इतरांच्या अधिकारांना बाधा पोहोचणार नाही, हे पाहणे सगळ्याच समाज धुरिणांचे प्राथमिक कर्तव्य आहे. तरीही एक जबाबदारर नागरी संघटना म्हणून आम्ही ही विनंती करत आहोत. नामांतरामुळे निर्माण झालेल्या अनिश्चित परिस्थितीला विराम द्यावा. सर्व विचारधारेच्या प्रमुखांना एकत्र बोलावून सामंजस्याने संबंधित विषय मार्गी लावावा, अशी विनंती पत्रातून मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे.
‘आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली प्रतिमा ठेवा’
शहरात नुकत्याच झालेल्या जी 20 परिषदेदरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवर शहर, जिल्हा तसेच राज्याची एक चांगली प्रतिमा तयार झाली आहे. ही प्रतिमा तशीच तपली जावी, अशी सर्वांची अपेक्षा आहे. मात्र आता नामांतराच्या मतभेदांमुळे शहराचं वातावरण बिघडू शकतं. याचा परिणाम थेट शहराच्या विकासावर होऊ शकतो. त्यामुळे मुक्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यात पुढाकार घेण्याची मागणी छत्रपती संभाजीनगर फर्स्ट या संघटनेने केली आहे.