मोठी बातमी ! औरंगाबाद की संभाजीनगर वादात नवा ट्विस्ट, उद्योजकांनो, भूमिका घ्या, खा. इम्तियाज जलील यांचं थेट आवाहन!
Aurangabad Name change | औरंगाबाद की संभाजीनगर यापैकी एक भूमिका उद्योजकांनी स्पष्ट करावी, असं आवाहन खा. जलील यांनी केलंय.
दत्ता कनवटे, छत्रपती संभाजीनगर | राज्य आणि केंद्र सरकारने औरंगाबाद (Aurangabad) शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) करण्यास मंजुरी दिली आहे. शहरातील बहुतांश ठिकाणी आता छत्रपती संभाजीनगर नाव वापरण्यास सुरुवात देखील झाली आहे. मात्र नामांतर विरोधी संघटनांनी अजूनही प्रयत्न सोडलेले नाही. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह नामांतर विरोधी संघटनांचं आंदोलन सुरुच आहे. शहरात वेगवेगळ्या मार्गांनी निदर्शनं आंदोलनं सुरु आहेत. खा. जलील यांच्या नेतृत्वात दोन दिवसांपूर्वी शहरातून मोठा कँडल मार्च काढण्यात आला. नामांतरविरोधी आणि नामांतराच्या समर्थनार्थ संघटनांच्या परस्पर विरोधात्मक भूमिकांमुळे शहराच्या सामाजिक सलोख्याला बाधा पोहोचू शकते, अशी भूमिका शहरातील उद्योजकांनी घेतली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रही पाठवलंय. मात्र खा. इम्तियाज जलील यांनी आता उद्योजकांनाच या वादात खेचलंय.
उद्योजकांनी भूमिका ठरवावी
खा. जलील म्हणाले, आम्ही लोकशाही मार्गाने प्रयत्न करत आहेत. ज्या उद्योजकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय, मी त्यांनाच विचारतो. त्यांच्यात बोलण्याची हिंमत नाही. उद्योग जगातील व्यक्तींनी त्यांना औरंगाबाद हवंय की संभाजीनगर नाव हवंय, ही भूमिका स्पष्ट करावी. कोणतीही भूमिका न घेणं हे चालणार नाही. आपल्या शहराला औद्योगिक नगरीचा दर्जा आहे. आपण अनेक देशात औरंगाबादकर म्हणून गेलो. त्यामुळे तुमचं काहीतरी मत असेल. तुम्हाला छत्रपती संभाजीनगर नाव हवं असेल तर ते तरी स्पष्ट सांगा, असं आवाहन खा. जलील यांनी केलंय.
उद्योजकांचं काय पत्र?
छत्रपती संभाजीनगर शहरातील उद्योजक, व्यापाऱ्यांच्या संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलंय. शहरातील नामांतर विरोधी आणि नामांतराच्या समर्थनार्थ होणाऱ्या घडामोडींमुळे सामाजित सलोखा बिघडू शकतो. शहरात अशांततेचं वातावरण निर्माण होऊ शकतं. याचा थेट परिणाम सामान्य नागरिक, व्यापारी वर्गाला बसू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वेळीच दोन्ही भूमिकांच्या संघटनांना एकत्र बसवून सोयीस्कर मार्ग काढावा, अशी मागणी या पत्रातून केली आहे.