3 हजाराची बकरी अन् 2 हजाराचा दंड, पाला खाल्ला म्हणून पोलिसांनीच चक्क बकरीला दिवसभर बांधलं; औरंगाबादमध्ये चाललंय काय?
औरंगाबादमध्ये कुत्र्याने माजी महापौरांचा बूट चोरल्याची घटना ताजी असतानाच एका बकरीने पाला खाल्ला म्हणून पोलिसांनीच ही बकरी दिवसभर बांधून ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांच्या या कारवाईवर संताप व्यक्त केला जात आहे.
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये चार कुत्र्यांनी माजी महापौरांचा 15 हजाराचा बूट चोरला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या कुत्र्यांचा शोध घेण्यासाठी अख्खी महापालिका कामाला लागली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवस शोध घेऊन अखेर एका कुत्र्याला पकडलं. पण पालिकेला बूटाचा शोध लागला नाही. कुत्र्याला श्वान पथक घेऊन गेले आहे. शिक्षा म्हणून आता या कुत्र्याची नसबंदी करण्यात येणार आहे. ही घटना ताजी असतानाच आता बकरीने पाला खाल्ला म्हणून बकरीला दिवसभर बांधून ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढेच नव्हे तर बकरीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या अजब कारवाईवर नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
औरंगाबाद शहरात कुत्र्याने बूट चोरल्याचा विषय थांबत नाही तोपर्यंतच बकरीने पाला खाल्याचा विषय समोर आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्याच्या आवारातील झाडांचा पाला खाल्ल्यामुळे पोलिसांनी चक्क बकरीला ताब्यात घेऊन दिवसभर बांधून ठेवले. तर सायंकाळी बकरीच्या मालकावर थेट गुन्हा दाखल करत 2 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 3 हजाराची बकरी आणि दोन हजाराचा दंड ठोठावल्यानंतर हाय अल्ला म्हणण्याची वेळ बकरी मालकावर आली आहे.
बकरी मालक संतापला
बकरी मालक राउफ रज्जाक सय्यद यांच्यावर कलम 90 (अ) प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे पिशोर हद्दीत अनेक बेकायदेशीर धंदे सुरू असताना बकरीने पाला खाल्ल्यामुळे गुन्हा दाखल केल्यानंतर पिशोर पोलिसांवर टीकेची झोड उठली आहे. बकरी मालकानेही पिशोर पोलिसांवर आपला संताप व्यक्त केला आहे. पिशोर पोलिसांच्या या अजबगजब कारवाईची सोशल मीडियावर जोरात चर्चा सुरू आहे.
काल कुत्र्याला शिक्षा
औरंगाबादचे माजी महापौर नंदकुमार घोडले यांच्या मातोश्री या निवासस्थानातून दोन दिवसांपूर्वी कुत्र्यांनी त्यांचा बूट पळवला होता. चार कुत्र्यांनी हा रात्रीच्यावेळी कारनामा केला. हे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं. माजी महापौरांचा 15 हजाराचा बूट कुत्र्याने पळवल्यानंतर संपूर्ण महापालिका कामाला लागली. पालिकेचे कर्मचारी दोन दिवस माजी महापौरांचा बूट शोधत होते. अखेरपर्यंत हा बूट सापडला नाही. मात्र, या चारपैकी एक कुत्रा सापडला. त्याला पालिका घेऊन गेली. या कुत्र्यावर नसबंदी करण्यात येणार आहे.
औरंगाबादमध्ये कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. या कुत्र्यांनी लोकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे आता पालिकेने या कुत्र्यांचा सुळसुळाट रोखावा, अशी मागणी माजी महापौर घोडले यांनी केलं आहे.