औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात (Dr Babasaheb Ambedkar Marathwada university) उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) नियोजित पुतळ्याच्या पायाभरणीचा सोहळा मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला. विशेष म्हणजे या पायाभरणीसाठी पंचधातूमध्ये राजगडाच्या किल्ल्याची माती आणि चवदार तळ्याचे पाणी आणले होते. ते समारंभपूर्वक पुतळ्याच्या चबुतऱ्यात सोडण्यात आले.
विद्यापीठातील छत्रपतींचा पुतळ्याची पायाभरणी मंगळवारी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य अॅड. विजय सुबुकडे पाटील होते. विजय पाटील यांनीच पंचधातूमध्ये राजगडाच्या किल्ल्याची माती आणली होती. तसेच जगाला समतेचा संदेश देणाऱ्या महाड येथील चवदार तळ्याचे पाणी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते पायाभरणी कार्यक्रमात टाकले गेले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगीच्या कार्यक्रमात बोलताना कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले, घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या या विद्यापीठात स्वराज्याची उभारणी करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येत आहे. छत्रपतींचा हा पुतळा पाहण्यासाठी विविध राज्यांमधून लोक येतील. याकरिता रायगडाची माती आणि चवदार तळ्याचे पाणी आणण्याचा विजय सुबूकडे यांनी केलेला संकल्प आज पूर्ण झाला. या क्षणाची नोंद विद्यापीठाच्या इतिहासात नक्कीच घेतली जाईल.
इतर बातम्या-