औरंगाबादः जन्मदात्या वडिलांच्या पार्थिवाला मुलाने किंवा पुरुषानेच खांदा देण्याची प्रथा भारतीय संस्कृतीत आहे. या पुरुषप्रधान रुढी, परंपरांना मोडीत काढत पाच मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिल्याची अत्यंत साकारात्मक घटना औरंगाबादमध्ये घडली. तिसगावातील पुरुषोत्तम नंदूलाल खंडेलवाल यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या मुलींनी वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याची इच्छा व्यक्त केली. नातेवाईकांनीही मुलींच्या या आग्रहाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि बापाच्या अखेरच्या प्रवासात लेकींनी त्यांची साथ दिली.
तिसगाव येथील पुरुषोत्तम नंदूलाल खंडेलवाल यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पाच मुलींनी त्यांच्या पार्थिवाला खांदा देत सर्व अंत्यसंस्कार पार पाडले. रेखा गणेश खंडेलवाल, राखी तपन खंडेलवाल, राणी पुरुषोत्तम खंडेलवाल, आरती उमेश खंडेलवाल, पूजा मयंक खंडेलवाल अशी या पाच मुलींची नावे आहेत. फ्लोरा कॉलनीतीली पुरुषोत्तम नंदुलाल खंडेलवाल यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. खंडेलवाल यांना पाच मुली असून मुलगा नाही. त्यांच्यामागे पाच मुली, जावई, नातवंड असा परिवार आहे. गुरुवारी दिनांक 20 जानेवारी रोजी तिसगाव म्हाडा कॉलनीतील कासलीवाल फ्लोरा कॉलनीत ही अत्यंयात्रा निघाली. त्यांच्या पार्थिवास भावकीतील व्यक्ती आणि जावई खांदा देण्यास पुढे सरसावले. मात्र पाचही मुलींनी त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. मुलगा आणि मुलगी असा भेद करू नये, असे समाज प्रबोधन सर्व स्तरांवर होत असले तरीही आजबी अनेक ठिकाणी पुरुष प्रधान संस्कृती, रुढी आणि परंपरा पाळल्या जातात. तिसगावात मात्र या पाच मुलींनी या प्रथा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला.
ज्या वडिलांनी संपूर्ण आयुष्यभर मुलींना मायेची ऊब दिली. त्यांचे ऋण फेडणे शक्य नाही. मात्र त्यांचा अखेरचा प्रवास आपल्या खांद्यावरून व्हावा, यासाठी मुलींनी त्यांच्या पार्थिवाला खांदा देण्याची इच्छा व्यक्त केली. उपस्थित नातेवाईकांनीही याला संमती दर्शवत, मुलींना प्रोत्साहन दिले. खंडेलवाल यांच्या पार्थिवाला नातू तेजसने मुखाग्नी दिला.
इतर बातम्या-