औरंगाबाद : मुसळधार पावसाने औरंगाबादमध्ये थैमान घातलंय. जोरदार पावसानंतर औरंगाबादमधील भिलदारी पाझर तलाव फुटलाय. यानंतर नागद परिसरात भीषण पूर आलाय. पूर आल्यानंतर मंदिरात अडकलेल्या पुजाऱ्याला स्लॅब फोडून नागरिकांनी बाहेर काढले. नागद गावातील नदीकाठावर असलेल्या मंदिरात हा प्रकार घडला. पूर आल्यामुळे मंदिराचा मुख्य दरवाजा पूर्णपणे बंद झाला होता.
नागद गावातील मंदिराचा दरवाज बंद झाल्यानंतर गावकऱ्यांनी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास रेस्क्यू ऑपरेशन रावबलं आणि स्लॅब फोडून पुजाऱ्याला बाहेर काढलं.
औरंगाबादमधील चाळीसगाव, कन्नड तालुक्याच्या सीमाभागात ढगफुटी झालीय. ढगफुटी सदृश्य पावसामुळे भिलदारी पाझर तलाव फुटला, तर कन्नड चाळीसगाव घाटात दरड कोसळली. कन्नड आणि चाळीसगाव तालुक्यात पावसामुळे हाहाकार माजलाय. ढगफूटी सदृश्य पावसामुळे अनेक नद्यांना पूर आलाय.
भिलदारी पाझर तलाव फुटीचा नागद गावाला जबरदस्त फटका बसलाय. नागद गावातील 30 ते 40 गाई म्हशींचा मृत्यू झालाय. पुराच्या पाण्यात फसून गाई म्हशींचा मृत्यू झाला. नदीच्या काठावरील गोठ्यात बांधलेल्या गाई म्हशींचा मृत्यू झाला. भिलदारी धरण फुटल्यामुळे नदीला जोरदार पूर आला होता. यात हे नुकसान झालं.
औरंगाबाद धुळे महामार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळली आहे. दरड कोसळून अनेक गाड्या चिखलात फसल्या आहेत. दरड कोसळून रस्ता पूर्णपणे बंद झालाय. अनेक नागरिक घाटात अडकले आहेत. कन्नड घाटात प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. घाटात अजूनही पाऊस सुरूच आहे. यामुळे कन्नड तालुक्यातील 10-12 गावांचा संपर्क तुटलाय.
कन्नड तालुक्यातील अंजना नदीवरील पूलही मुसळधार पावसाने वाहून गेलाय. पळशी बुद्रुक, पळशी खुर्द आणि साखर वेल या गावांचा संपर्क तुटलाय. अंजना नदीला जोरदार पूर आलाय. पुराच्या पाण्यात पूल वाहून गेलाय. पूल वाहून गेल्यामुळे तीन गावांचा संपर्क तुटला. कन्नड तालुक्यात अजूनही मुसळधार पाऊस सुरूच आहे.
मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने बीड जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील कुंडलिका नदीला पूर आला आहे. तर आंबेसावळी नदीदेखील खळखळून वाहत आहे. बीडच्या बिंदुसरा नदीलादेखील पाणी आले आहे. जिल्ह्यातील सर्वच नदी- नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मध्यरात्री झालेल्या या पावसामुळे ऊसासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक नदीपात्र यंदा सफाई केलीच नसल्याने अनेक गावांना पुराचा तडाखा बसण्याची मोठी शक्यता नाकारता येत नाही.
भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 3-4 दिवस राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. काही ठिकाणी तर अतीमुसळधार पाऊसही पडू शकतो, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. मुंबई हवामान विभागाने सॅटेलाईट आणि रडार इमेजेसच्या आधारे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. पुणे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि बीडमध्ये पुढील 3-4 तास पावसाचा जोर अधिक असेल असंही नमूद करण्यात आलंय. पालघर, रायगड, ठाणे या कोकणातील भागात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
Heavy rain fall in Aurangabad bridge collapse temple in water land sliding